। पनवेल । वार्ताहर ।
केंद्रशासन व महाराष्ट्र राज्य आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आदेशान्वये पनवेल महानगरपालिका अंतर्गत असणार्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दि.1 ते 15 एप्रिल दरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’ राबविण्यात आला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशान्वये महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छता कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती. त्याप्रमाणे महापालिकेच्या चारही प्रभागांमध्ये, महापालिकेच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
यामध्ये महापालिका हद्दीतील गावांमध्ये व झोपडपट्टी परिसरात जावून स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. महापालिका क्षेत्रातील शाळांमधील किशोरवयीन मुलींना मासिकपाळी दरम्यान स्वच्छता कशी पाळायची याचे चारही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकिय अधिकार्यांनी मार्गदर्शन केले. जैववैद्यकीय कचरा विलगीकरणाचे प्रशिक्षण आशा स्वयंसेविका व स्वच्छता दुत यांना देण्यात आले. हात स्वच्छ कसा धुवावा यांचे प्रात्यक्षिक शाळांमधील विद्यार्थ्यांना, गाव आणि परिसरातील लोकांना देण्यात आले. याबरोबरच महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगला पोषक आहार व निरोगी जीवनशैली याचे मार्गदर्शन विविध पोस्टर्स,रांगोळ्या, प्रत्यक्ष फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य यांच्या माध्यमातून करण्यात आले.







