पालीमध्ये नालेसफाईची कामे युद्धपातळीवर

विशेष टीमसह यंत्रसामग्रीचा वापर
। सुधागड-पाली । वार्ताहर ।

पाली शहरातील नालेसफाईच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे विशेष टीम आणि यंत्रसामग्रीचा वापर करून ही नालेसफाई केली जात आहे. यामुळे येत्या पावसाळ्यात नाले तुंबण्याची शक्यता नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या नालेसफाईच्या कामांना 12 तारखेपासून सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत वाघजाई नगर, गुरांचा दवाखाना, उंबरवाडी, बेगर आळी, सावंत आळी, आगर आळी, भोईआळी, बुरुड आळी, राम आळी, मधली आळी, कासार आळी, बाजार पेठ, कुंभार आळी, एकता पथ आळी, खडक आळी, सोनार आळी, वरचा व खालचा मोहल्ला, स्मशानभूमी मार्ग, बल्लाळेश्‍वर मंदिर परिसर व देऊळवाडा परिसरातील नाले व गटारांची साफसफाई पूर्ण झाली आली आहे. येत्या 7 ते 8 दिवसांत उर्वरित पाली शहर, झाप गाव व परिसरातील नाले व गटारांची साफसफाई पूर्ण होईल असे स्वच्छता व वैद्यक सार्वजनिक आरोग्य समिती सभापती विनायक जाधव यांनी सांगितले.


नाले सफाईसाठी भाडे करारावर 10 कामगारांच्या टीमची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्या जोडीला नगरपंचायत सफाई कामगार आहेत. सर्व जण युद्ध पातळीवर नालेसफाईची कामे करीत आहेत. याबरोबरच जेसीबी, ट्रॅक्टर आदी यंत्रसामग्रीचा देखील वापर केला जात आहे. नाल्यातील प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक कचरा, झाडेझुडपे व गाळ पूर्णपणे काढून टाकला जात आहे. मातीने बुजलेली गटारे खोदण्यात आली आहेत. मे अखेर नालेसफाईची कामे पूर्ण होतील. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने व देखरेखीखाली नालेसफाईच्या कामांचे योग्य प्रकारे नियोजन व व्यवस्थापन केले आहे. आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ वापरून सुनियोजितरित्या नालेसफाईची कामे होत आहेत.

विनायक जाधव, सभापती, स्वच्छता व वैद्यक सार्वजनिक आरोग्य समिती
Exit mobile version