। पनवेल । वार्ताहर ।
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यात आजपर्यंत एकूण 5232 प्रकरणे केली आहेत. म्हणजेच वर्षाला साधारण 52 ते 53 लाखाचा लाभ या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतो. पनवेल तालुक्यात मागील दिड वर्षात तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी योजनेंतर्गत एकूण 791 प्रकरणे मंजूर झाली आहेत. 791 नवीन लाभार्थ्यांना वेगवेगळ्या महिन्यात बैठका घेऊन मंजुरी दिलेली आहे. यामध्ये प्राधान्याने निराधार, विधवा, अपंग, अनाथ मुले यांना प्राधान्य दिले आहे. कोविड काळात दुर्दैवाने ज्या महिलांना वैध्यव्य प्राप्त झाले अशा महिलांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकूण 20 प्रकरणे मंजूर केली असून त्यांना संजय गांधी योजनेचा लाभ झाला आहे.
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दि. 24 मार्च 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार पनवेल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन, सामाजिक व विशेष सहाय्य विभाग यामध्ये समितीच्या बैठकीबाबत मार्गदर्शक सूचनाही दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली बुधवारी तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नवनियुक्त समितीचे अध्यक्ष दर्शन ठाकूर व सदस्य तसेच शासकीय सदस्य यांचे महसूल प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य आदी योजनांबाबत नायब तहसीलदार तथा संजय गांधी योजनेकगे आहरण व संवितरण अधिकारी एकनाथ नाईक यांनी सविस्तर माहिती देऊन कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
समिती स्थापन झाल्यामुळे या कामाला अधिक गती मिळणार आहे. या मोहिमेत लाभार्थ्यांना लाभ मिळवून देताना काही अपात्र लाभार्थी देखील असतात त्यांची शोध मोहीम हाती घेत आहोत. यामध्ये ग्रामसेवकांच्या मार्फत ग्रामसभेमध्ये या याद्यांचे वाचन केले जाणार असून ग्रामसभेमार्फत अपात्र लाभार्थी ठरवून त्यांचा लाभ कमी करणार आहोत.
विजय तळेकर, तहसीलदार पनवेल तालुका






