संजय कार्लेची गोळ्या झाडून हत्या

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील तारा गाव हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत (दि.18) सायंकाळी लाल रंगाच्या ऑडी कारमध्ये मृतावस्थेत आढळूनआलेल्या संजय मारुती कार्ले (45) यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍यांविरुध्द हत्यासह आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. कार्ले यांच्यावर तळेगाव-दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीसह मोक्का अन्वये गुन्हा दाखल असून, सहा महिन्यांपूर्वी ते पेरोलवर बाहेर आले होते. पुणेमधील तळेगाव दाभाडे भागात राहणारे मृत संजय कार्ले (दि.18) सकाळी कामानिमित्त मुंबई शहरात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह लाल रंगाच्या ऑडी कारमध्ये पनवेल तालुक्यातील तारा गाव हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आढळून आला होता. दिवसभर सदर कार त्याच ठिकाणी उभी असल्याचे लक्षात आल्यानंतर काही लोकांनी कारमध्ये पाहणी केल्यानंतर त्यात मृत व्यक्ती असल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कार मधील संजय कार्ले यांचा मृतदेह कारची काच फोडून ताब्यात घेतला.

यावेळी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृत संजय कार्ले यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याचे आढळुन आले आहे. अज्ञात मारेकर्‍यांनी संजय कार्ले यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह कारच्या दोन्ही सीटमध्ये कोंबण्यात आल्याचे आढळुन आले आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांकडून अज्ञात मारेकर्‍याविरोधात हत्या आणि आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, मृत संजय कार्ले यांनी अनेकांची फसवणूक केली असून, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करुन त्यांना अटक देखील केली होती. सहा महिन्यांपूर्वीच संजय कार्ले पेरोलवर सुटून आले होते. याच वैमनस्यातून संजय कार्ले यांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version