मोदी, फडणवीसांनी महाराष्ट्राची वाट लावली

खासदार संजय राऊत यांचे प्रतिपादन

। नाशिक । वृत्तसंस्था ।

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्राची वाट लावली आहे. पूर्वी दिल्लीत महाराष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता, आता शरमेने मान खाली जाते. राज्याची वाताहात करणाऱ्यांना हातभार लावणाऱ्या गद्दारांना गाडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची क्रांतीची मशाल प्रत्येकाने पेटती ठेवायची आहे, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले.

तिडके कॉलनीतील तुपसाखरे लॉन्स या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेर ठाकरे पक्षाचा कार्यकता संवाद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी खासदार राऊत म्हणाले, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये पुन्हा शिवशाही निर्माण करायची आहे. राज्यात सर्वाधिक जागा शिवसेवा नाशिक शहर जिल्ह्यात लढवित आहे.

मात्र, गेल्या अडीच वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकविले आहे. गुजरातमधून ड्रग्जस नाशिकपर्यंत पोहोचत आहेत. शहराच्या गल्लीबोळात एमडी ड्रग्ज उपलब्ध असून, हे ड्रग्जमाफिया सत्ताधार्‍यांना खंडण्या, पैसे पुरवितात. पुरोगामी महाराष्ट्राला भाजपाने गुंडांचे राज्य केले आहे. मुंबईमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’ यासारखे फलक लावून द्वेषाचे राजकारण केले जात असल्याचे ते म्हणाले.

खा. राऊत पुढे म्हणाले, भाजपाने मूळ पक्ष फोडून गद्दारांना खऱ्या पक्षांचा दर्जा देण्याचा प्रयत्न करताना न्यायालयांवर दबाव आणला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी स्वाभिमानासाठी शिवसेनेची स्थापना केली. एकनाथ शिंदे शिवसेनेवर दावा सांगतात पण शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा त्यांचा जन्म तरी झाला होता का? असा सवाल करीत, छगन भुजबळांना तरुणांची आठवण आली की झोप लागत नाही. पण आम्हीही तुरुंगात गेलो पण दबावाला बळी पडलो नाही, असे ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर नाशिक मध्यचे उमेदवार वसंत गिते यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजे, आघाडीतील आकाश छाजेड, राहुल दिवे, दत्ता गायकवाड, सुनील बागुल, नाना महाले, शाहू खैरे, विनायक पांडे आदीं उपस्थित होते.

नाशिकमध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना सापडतो. सत्ताधाऱ्यांना ड्रग्जमाफियांकडून खंडण्या, पैसे पुरविले जातात. छोटी भाभी, बडी भाभीला आता परत विधानसभेत पाठवायचे नाही. तर, भयमुक्त आणि ड्रग्जमुक्त नाशिकसाठी नाशिक मध्यची चाबी ज्यांच्या हाती आहे ते वसंत गितेच विधानसभेवर जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा वचननामा मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन खा. राऊत यांनी केले. बहिणी शहाण्या आहेत. महायुतीला लाडक्या बहिणींचा पुळका आला आहे. पण पंधराशे रुपये पुरेसे ठरतात का? पण बहिणी शहाण्या आहेत. महाविकास आघाडीने वचननाम्यात महालक्ष्मी योजना आणली जाईल. त्याद्वारे महिलांना तीन हजार रुपये, शेतकऱ्यांना 25 लाखांचा विमा दिला जाणार असल्याचेही खासदार संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version