तपास यंत्रणाच्या कारवाईबाबत केंद्राला जाब विचारणार-राऊत

। मुंबई । प्रतिनिधी ।
मागील काही वर्षात विरोधकांवर ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत होत असलेल्या कारवाईचा मुद्दा संसदीय समितीसमोर उपस्थित करणार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणांनी राजकीय हेतूने अटक सत्र सुरू केले आहे. तपास यंत्रणांकडून होत असलेल्या या कारवाईची संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती. या पत्राचाळीशी माझा काहीही संबंध नसल्याचे राऊत यांनी सांगितले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे मी स्वागत करतो. देश हा राज्यघटनेच्या चौकटीत चालतो. संविधानाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. सध्या संविधानाची पायमल्ली होत असल्याचे त्यांनी म्हटले.

मोदींची घेणार भेट
संजय राऊत यांनी म्हटले की, ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात माझा खूप छळ झाला. मी लवकरच देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांना माझा तुरुंगातील अनुभव आणि माझ्यावर कोणत्या पद्धतीने कारवाई करण्यात आली याची माहिती देणार आहे.

Exit mobile version