पाच वर्षांमध्ये माणुसकीचा खून

राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

। मुंबई । प्रतिनिधी ।

बीड आणि परभणीत घडलेल्या घटनांमुळे राज्यातील सामाजिक वातावरणासोबतच राजकीय वातावरणसुद्धा ढवळून निघाले आहे. या घटनांमुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला असताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून सरकारला खडेबोल सुनावले आहेत. हा महाराष्ट्र मानवतेसाठी, माणुसकीसाठी ओळखला जात होता. परंतु, गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यातील माणुसकीचा खून झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मंगळवारी (दि.24)राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले की, राहुल गांधी परभणीत गेल्याने बीड आणि परभणीतील घटना देशपातळीवर गेल्या आणि फडणवीसांची बेअब्रू झाली. एका आदर्श सरपंचाची ज्या प्रकारे हत्या झाली त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनापासून खंत आणि खेद व्यक्त केला का? याबाबत आमच्या मनात संशय आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचीही हत्याच झाली आहे. हे राहुल गांधी बरोबर बोलले आहेत. या दोन्ही हत्यांची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायलाच हवी. तुमचे मंत्री निर्लज्जांसारखे जात आहेत, तर ज्यांनी हत्या घडवल्या त्यांना पाठिशी घालत आहेत. मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष नेमले आहेत. पण ते या ठिकाणी येणार नाहीत कारण ते मोदींचे गुलाम आहेत, असा आरोप खासदार राऊतांनी केला आहे.

फडणवीसांचे पित्त का खवळावे?
काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमवारी परभणीच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी पभणीच्या हिंसाचारात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट दिली. परंतु, हा त्यांचा हा दौरा नौटंकी असल्याची टीका भाजपाच्या नेतेमंडळींनी केली. तसेच, त्यांच्या या भेटीवर राहुल गांधी हे राजकारण करत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेला खा. संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींच्या परभणी भेटीमुळे फडणवीसांचे पित्त का खवळले? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
Exit mobile version