| उरण | वार्ताहर |
मावळ लोकसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (दि. 23) हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर वाजत गाजत आपला उमेदवारी अर्ज भरला. प्रथम काळभैरव मंदिरात दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मिरवणुकीने अर्ज दाखल केला.
सध्याचे खासदार हे जनतेची कामे करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. आपल्या मतदारसंघातील जेएनपीटीसारख्या आस्थापनाचे सीएसआर फंड स्थानिकांना उपयोग न होता बाहेर पाठविण्यात येतो. नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा. पाटील साहेबांचे नाव लागावे यासाठी पाठपुरावा करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे उरण, पनवेल, कर्जतमधील जनता नाराज आहे. याचा फटका त्यांना मतदानातून बसेल आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे भरघोस मताधिक्क्याने निवडून येतील, अशा भावना रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.
संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातून मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा, विनोद म्हात्रे, किरीट पाटील, अखलाक शिलोत्री, संजय ठाकूर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.