संकष्टीला पालीत फुलला भक्तीमळा

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आलीत. त्यामुळे भाविक खुश आहेत. आता केव्हाही बाप्पाचे दर्शन घेण्याची मुभा मिळाली आहे. भाविकांचा मंदिरातील ओघ देखील वाढला आहे. पालीतील बल्लाळेश्‍वर मंदिरात बुधवार (दि.22) संकष्टी चतुर्थीला दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. पालीत चहूबाजुनी पर्यटक व भाविक आल्याने जणू भक्तीमळा फुलला होता. रांगेत उभे राहून भाविकांनी बल्लाळेश्‍वराचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले. संकष्टी निमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॅाटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले जय्यत तयारीत होते. आदिवासी महिला भगिनी रानभाज्या व कंदमुळे विक्रीस घेऊन बसल्या होत्या. भाविकांनी येथून चांगली खरेदी केली. त्यामुळे त्यांच्या रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली. दरम्यान मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.


वाहतूक कोंडी
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे वाहतुक कोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्‍वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवळाच्या शेजारून जाणारी सर्व वाहने भक्तनिवास क्रमांक 1 च्या बाजूने वळविण्यात आली होती.

Exit mobile version