सपाची ताकद वाढतेय
लखनऊ | वृत्तसंस्था |
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशामध्ये सत्ताधारी भाजपच्या योगी सरकारला लागोपाठ धक्के बसत असून, पक्षाचे मंत्रीच आता राजीनामा देत समाजावादी पक्षात सहभागी होऊ लागल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावरच भाजपवर संक्रांत आल्याचे दिसत आहे.
यूपीमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपला अनेक धक्के बसत असून, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यापूर्वीच उत्तर प्रदेश सरकारचे कामगार आणि रोजगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपला रामराम केला आहे. भाजप सरकार दलित, मागास, तरुण, शेतकरी, बेरोजगार आणि वंचितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर दुसर्याच दिवशी वनमंत्री दारा सिंह चौहान यांनीही राजीनामा दिला आहे. तर, गुरुवारी योगी सरकारमधील आणखी एक मंत्री धरमसिंह सैनी यांनीदेखील राजीनामा दिला आहे. बहुतांश आमदार आणि मंत्री समाजवादी पार्टीमध्ये सामील होत आहेत.
काँग्रेसची पहिली यादी जाहीर
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 125 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. काँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी यांनी यादी जाहीर केली असून, यामध्ये 50 महिलांना संधी देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संबंधित यादीत उन्नावमध्ये बलात्कार पीडित तरुणीच्या आईलादेखील तिकीट देण्यात आले आहे.
यूपीत भाजपवर संक्रांत; मंत्र्यांसह आमदारांचा पक्षाला रामराम
