। महाड । वार्ताहर ।
संस्कारधाम विद्यालय माध्यमिक शाळा व जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र शासन तर्फे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कौशल्य दाखवले.
मुलींच्या मैदानी स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात श्रद्धा सतीश देशमुख ही भाला फेकमध्ये प्रथम, १९ वर्षाखालील गटात पायल अनिल कदम हिने भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच मुलांमध्ये १९ वर्षाखालील गटात सुजल सुनील कालगुडे याने ८०० मी.धावणेमध्ये प्रथम क्रमांक, १५०० मी. धावणेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला, १७ वर्षाखालील गटात यश संजय वेल्हाळ तिहेरी उडीमध्ये द्वितीय, उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. १७ वर्षाखालील गटात प्रसाद अजित सकपाळ याने तिहेरी उडीमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला, तसेच १९ वर्षाखालील गटात तनिष प्रवीण लाड या विद्यार्थ्याने उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यालयातील पुढील विद्यार्थी यश वेल्हाळ, सुजल कालगुडे, श्रद्धा देशमुख व पायल कदम या चार विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली. विद्यार्थ्यांची जिद्द चिकाटी व मेहनत या तिन्ही गोष्टींचा मेळ स्पर्धांच्या निकालातून दिसून आला. यांना कोचिंग करणारे क्रीडा शिक्षक दिलीप सकपाळ यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेली मेहनत याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. तसेच विद्यार्थ्यांचे, सहाय्य करणाऱ्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक व संस्थेचे सहसचिव तसेच प्राचार्य यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व त्यांना पुढील विभागीय स्तरावर खेळण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.