समीप दिसे पंढरी, याच मंदिरी माझी माऊली

नाट्य दिग्दर्शक संतोष ठाकूर यांनी केले अभंगातून स्वच्छतेचे प्रबोधन

। चिरनेर । प्रतिनिधी ।

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलनामाचा गजर व टाळ-मृदुंगाच्या निनादाने पांडुरंगाची पंढरी बुधवारी दुमदुमून गेली होती. उरण तालुक्यातील भाविकांना पंढरपूरच्या विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी उरण ते पंढरपूर अशी वारीसाठी उरण एसटी आगारातर्फे एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. चिरनेरचे नाट्य दिग्दर्शक तथा विठ्ठलभक्त संतोष ठाकूर यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वारीत सहभाग घेतला होता. दरम्यान, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वारीचे नियोजन करण्यात आले होते.

वारीत विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी असा विठू नामाचा गजर झाला. उरणचे आगार व्यवस्थापक श्री. दराडे, पनवेल आगाराचे व्यस्स्थापक श्री. म्हात्रे, महेश लहिटे, संतोष ठाकूर, वाहक अशोक कोळी, कांचन ठाकूर, कृष्णा कोळी व प्रमोद पाटील या सर्वांनी दिंडीतील नागरिकांची काळजी घेत, त्यांची मनोभावे सेवा केली. यावेळी प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक संतोष ठाकूर यांनी स्वरचित अभंग रचनातून स्वच्छता, पर्यावरण व संवर्धन याचे महत्त्व पटवून दिले. तसेच पनवेलचे आगार व्यवस्थापक श्री. म्हात्रे यांना पनवेल ते आवरे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बस सुरू करण्याबाबत संतोष ठाकूर यांनी विनंती केली. कांचन ठाकूर, महेश लहीटे संतोष ठाकूर प्रमोद पाटील या सर्वांनी फळे, पाणी, बिस्कीट व लाडूच्या नाश्त्याची व्यवस्था केली होती.

Exit mobile version