कोरोनाच्या जनजागृतीसाठी संतोष पवार यांची उरण ते महड पदयात्रा

। उरण । वार्ताहर ।
देशात कोरोनाची संकट गेली दोन वर्षांपासून सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेमध्ये अनेकांना आपल्यामधून हिरावून नेले आहे. आता येऊ घातलेल्या तिसर्‍या लाटेमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत याची झळ पोहचणार आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी रविवारी कोव्हिड सेंटर उरण येथून आपल्या पदयात्रेला सुरुवात केली आहे. देशात, राज्यात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे हे आपण पाहतो आहोत. ह्याच तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव रायगड जिल्ह्यात होऊ नये म्हणून गेले दीड वर्ष घरदार सोडून अविरत कोव्हिड पॉझिटीव्ह रुग्णांची सेवा करीत असणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी सध्या सुरू असणार्‍या गणपती उत्सवानिमित्त अनेक ठिकाणी होणारी गर्दी पाहून जनतेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. जनजागृतीच्या उद्देशाने आणि तिसर्‍या लाटेपासून जनतेचा बचाव होण्याच्या हेतूने श्रीगणेशोत्सवाचे औचित्य साधून उरण ते महड हे 56 किलोमीटर अंतर पायी चालत जाणार आहेत. त्यावेळी संतोष पवार यांच्या हातात कोव्हिड संदर्भात निर्बंध पाळू या, आपल्या कुटूंबाचे रक्षण करू या आणि करू या, पृथ्वीचे रक्षण करू या पर्यावरण संरक्षण अशा प्रकारचे बॅनर घेऊन ते पायी पदयात्रा सुरू केली आहे.

Exit mobile version