खारघरमध्ये संतोष शेट्टीसह सहकाऱ्यांचा शेकापमध्ये जाहीर पक्षप्रवेश

| पनवेल | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या खारघर कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि.27) कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी सांगितले प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष नेहमी खंबीरपणे उभा राहतो. यावेळी खारघर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष शेट्टी आणि त्यांचे महिला आणि पुरुष सहकारी यांनी बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत माजी आ. बाळाराम पाटील यांनी केले.

याप्रसंगी बोलताना बाळाराम पाटील यांनी सांगितले की, आज खारघरचा जो विकास आपल्याला दिसत आहे. तो शेतकरी कामगार पक्षाची ग्रामपंचायत असताना झालेला आहे. पनवेल महानगरपालिका आल्यानंतर खारघर शहर भकास वाटू लागले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस भाजप आमदारांनी सांगितले होते, की आम्ही कोणताही कर लावणार नाही. मात्र, आता तेच आमदार नागरिकांनी प्रॉपर्टी टॅक्स भरला नाही तर त्यांच्यावर केसेस दाखल करा असे सांगतात. यावरून प्रॉपर्टी टॅक्स बाबत त्यांची दुहेरी भूमिका लक्षात येत आहे. तेव्हा अशा या आमदारांना येणाऱ्या महानगरपालिकेत धडा शिकवा. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी पनवेल शेकाप विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मढवी, पनवेल महानगरपालिका चिटणीस प्रकाश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version