| अलिबाग | वार्ताहर |
अलिबागचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. मूळच्या अलिबागच्या आणि सध्या पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्ट्रुमेंटेशन विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका असलेल्या सपना कोरडे-घोडिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाने अलिबागच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सदर पदवीदान समारंभ शनिवारी (दि.21) रोजी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात कुलगुरू प्रोफेसर भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला.
सपना यांनी रॅपिड डिटेक्शन ॲड क्वांटिफिकेशन ऑफ काऊ मिल्क अडलट्रेशन (गाईच्या दुधातील भेसळ जलद ओळखणे आणि तिचे प्रमाण निश्चित करणे) या महत्त्वाच्या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला होता. या प्रबंधासाठी सी.ओ.ई.पी. टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर उत्तम चासकर यांनी सपना यांना मोलाचे मार्गदर्शन केले होते. सपना यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल अलिबागसह महाराष्ट्रातून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या सोहळ्यासाठी जेसीबी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शेट्टी, टाटा प्रोजेक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पै यांच्यासह अनेक मान्यवर प्राध्यापक उपस्थित होते.






