सारा ठाकूर मृत्यूप्रकरण चिघळणार

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शब्द फिरवला

| पेण | प्रतिनिधी |

सर्पदंशाने मृत्यू ओढावलेल्या जिते येथील सारा ठाकूर प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत संबंधित डॉक्टराला निलंबित करण्याचे जाहीर करुन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मी तसा शब्दच दिला नव्हता असे जाहीर करत आपला शब्द फिरविल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पेण तहसील कार्यालयात सारा मृत्यू प्रकरणासंदर्भात आ. रवीशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, जिल्हा उपरुग्णालय पेणच्या आरोग्या अधिक्षक संध्या रजपूत, जिल्हा परिषद सदस्य डी.बी.पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर उपस्थित होते.

या बैठकीमध्ये साराच्या कुटुंबियांकडून ग्रामस्थ जिते व जिल्हा परिषद सदस्य डी.बी. पाटील यांनी सर्व घटनाक्रम सांगितला व आरोग्य यंत्रण कशाप्रकारे काम करते याचा पाढा वाचला. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी व उपजिल्हा रुग्णालय पेणच्या वैद्यकीय अधिक्षक संध्या रजपूत यांनी सांगितले की, आम्ही आमच्या डॉक्टरांपुढे हतबल आहोत ते आमचे काहीही ऐकत नाहीत तर उलट ते आम्हालाच दम देतात, असे त्या म्हणाल्या. शनिवारी झालेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले होते की, या प्रकरणातील दोषी डॉ. मिलिंद पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अहवाल कोकण आयुक्तांकडे पाठविला आहे. परंतु बैठकीत विचारल्यानंतर त्यांनी आपला शब्द फिरवत मी पाठवला असे म्हणाले नाही तर मी पाठवणार आहे असे म्हणाले. मात्र, त्यावेळी समस्त जिते ग्रामस्थ भडकले आणि आम्ही रेकॉडिंग केले आहे की मी प्रस्ताव पाठवला आहे असेच आपण म्हणालात. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी आपला शब्द फिरवल्याचे तिथे स्पष्ट झाले तसेच आत्तापर्यंत त्यांच्याकडून डॉ. मिलिंद पाटील यांच्याविरुध्द अहवालच तयार झालेला नाही. तसेच कृषीवलच्या हाती लागलेल्या माहिती नुसार डॉ. मिलिंद पाटील यांचा अहवाल कोकण आयुक्तांना गेल्यास त्यांच्यावर क्षणार्धात बडतर्फीची कारवाई होणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून चालढकल सुरु आहे त्यावर आ. रवीशेठ पाटील यांच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत मात्र हे आदेश अधिकारी किती वेळ पाळतील हे येणारा काळ ठरवेल.

डॉक्टरांची स्वतःला वाचविण्यासाठी पळापळ
सारा मृत्यु प्रकरणातील बेजबाबदार डॉ. मिलिंद पाटील हे स्वतःला वाचविण्यासाठी पेण येथील लोकप्रतिनिधींच्या घराचे उंबरठे झिजवत असून स्वतःला वाचविण्यासाठी शिष्ठमंडळ घेउन तालुक्यातील लोकप्रतिनिधींची भेटी घेत आहेत. परंतु, तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी डॉ. मिलिंद व त्यांच्या शिष्ठमंडळाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. महत्वाची बाब म्हणजे हे डॉ. लोकल असल्याने मनमानेल तसे बेजबाबदारपणे वागण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Exit mobile version