सर्जा-राजा उतरले मैदानात

नवेदर बेलीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन; चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थित

| अलिबाग | शहर प्रतिनिधी |


लोकांचा ओसंडत असलेला अभुतपूर्व उत्साह, शर्यतीत आपल्याच सर्जा-राजाची जोडी जिंकावी म्हणून बैलगाडी चालक-मालकांची सुरु असलेली धावपळ, शर्यत पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांचा जोश, गुलालात रंगलेली बैलजोडी…हे सारे चित्र नवेदरबेली माती बंदर येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत पहायला मिळाले. हौशी बैलगाडी मित्र मंडळ नवेदरबेली-ढवर यांच्यावतीने रविवारी (दि. 7) बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर हौशी बैलगाडी मित्र मंडळ नवेदरबेली-ढवर अध्यक्ष दिपक राऊत, उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व बैलगाडी प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत बैलगाडीचे एकूण 23 गट व घोडागाडीचे 3 गट करण्यात आले होते. स्पर्धेत अंतिम गटातील संदिप पाटील-ढवर यांनी प्रथम क्रमांक, जगन्नाथ ठाकूर- यशवंतखार यांनी द्वितीय क्रमांक, महेंद्र साळवी-नागझरी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तर, उपांत्य गटातील महेश पाटील-ढवर यांनी प्रथम क्रमांक, व्दितीय चापडे बंधू-बहिरोळे यांनी द्वितीय क्रमांक, आदर्श कार्लेकर-कुरूळ यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

शेतकरी कामगार पक्ष कायमच शिक्षण, आरोग्य, क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देत आला आहे. बैलगाडी, घोडागाडी स्पर्धेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास अथवा दुर्घटना घडल्यास शेकाप मदत करण्यास एक पाऊल पुढे असेल. लवकरच बेली गावात सायकल व चष्मा वाटप शिबीर घेण्यात येईल.

चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख
Exit mobile version