| आगरदांडा | वार्ताहर |
लोकशाहीमध्ये मतदार हा सर्वोच्य आहे. त्यांनी केलेल्या मतदानामुळे लोकप्रतिनिधी निवडून येत असतात. या निवडणुकीत मुरुड तालुक्यात इंडिया आघाडीला चांगले यश प्राप्त झाले आहे. आगामी काळात आघाडी कायम रहाणार आहे. नवीन निवडून आलेल्या सरपंच उपसरपंच व सदस्यांनी अधिक सजग होऊन लोकांच्या समस्या सोडवण्यास प्रथम प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी आमदार पंडित पाटील यांनी केले.
माजी आमदार पंडित पाटील यांच्या शिघ्रे येथील निवासस्थानी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, अध्यक्ष तुकाराम पाटील, माजी सरपंच विजय गीदी, रमेश दिवेकर, राजपुरी सरपंच सुप्रिया गीदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसरपंच इस्माईल सिद्दिक, माजी सरपंच लियाकत कासकर, महेश मापगावकर, ललित मढवी, नांदगाव ग्रामपंचायत उपसरपंच मेघा मापगावकर, वीरेंद्र देऊळकर, सुरेश मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गाव स्वच्छ ठेवा, स्मशानभूमी स्वच्छ ठेवा त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राउंडची उपाययोजना करावी, असे पाटील यांनी सांगितले. ग्रामसेवकांवर अंकुश ठेवता आला पाहिजे. लोकांच्या कामाला प्रथम प्राधान्य देऊन जास्तीत जास्त वेळ लोकांसाठी द्यावा. विजय झाला म्हणून गाफील राहू नका. लोकांनी आपल्याला त्यांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. हे कधीच विसरु नका असा सल्ला देखील त्यांनी दिला.
यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनी माझेरी रस्ता, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली. तातडीने हे दोन्ही प्रश्न लवकरच सोडविण्याचे अभिवचन माजी आमदार पाटील यांनी दिले. याप्रसंगी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.