| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असो.च्यावतीने 19 वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित आंतरजिल्हा दोनदिवसीय कसोटी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट मैदानावर खेळवल्या गेल्या. त्यातील खेळवल्या गेलेल्या सातारा जिल्हा क्रिकेट असो. विरुद्ध हिंगोली जिल्हा क्रिकेट असो. या संघांमधील सामन्यात सातारा संघाने दणदणीत विजय मिळवला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सातारा संघाने पहिल्या डावात सर्व बाद 309 धावा फलकावर नोंदवल्या. त्यामध्ये शादाब मुजावर याने सर्वाधिक 75 धावा केल्या. तर, ईशान जोशीने 53 तर सृजन बिचुकले याने 51 धावा केला. यावेळी हिंगोली संघाकडून ओंकार मोगल याने 4 गडी बाद केले. त्यानंतर हिंगोली संघाने पहिल्या डावात सर्वबाद 118 धावा केल्या. यावेळी सातारा संघाकडून ईशान जोशी व श्रावण खाडे याने प्रत्येकी 4 फलंदाज बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात सातारा संघाने 4 गडी बाद 145 धावसंखेवर डाव घोषित केला. त्यामध्ये आदिनाथ पाटील याने 52, तर सृजन बिचुकले याने 42 धावांची खेळी केली. हिंगोलीच्या संघाकडून सम्यक बागुल याने 3 फलंदाजांना बाद केले. यावेळी चौथ्या डावात हिंगोलीच्या संघाला जिंकण्यासाठी 336 धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र, हिंगोलीचा डाव साताऱ्याच्या भेदक गोलंदाजींपुढे अवघ्या 140 धावसंखेवर गडगडला. यावेळी सातारा संघाकडून शादाब मुजावर याने सर्वाधिक 5, तर अनिमेश घोरपडे याने 3 फलंदाज बाद केले. त्यामुळे सातारा संघाने हा सामना 196 धावांनी जिंकत दणदणीत विजय मिळवला. संघाचे प्रशिक्षक हेमंत गुजर यांनी विजयाचे सर्व श्रेय खेळाडूंनी मैदानावर घेतलेल्या मेहनतीला दिले आहे.







