शशिकांत शिंदेंना विश्वास
| सातारा | प्रतिनिधी |
माझ्यासमोर कोण उमेदवार आहे, तो मी पाहिलेला नाही. माझी त्यांच्याशी स्पर्धा नसून माझी लढाई तत्त्वाची आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे. जिल्ह्यातील जनतेला बदल हवा असून, या जनतेच्या ताकदीवर ही निवडणूक मी लढत आहे. खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा पुन्हा एकदा इतिहास घडवेल आणि शरद पवार यांचा जिल्हा पुन्हा अबाधित राहील, असा विश्वास आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचे जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शशिकांत शिंदे म्हणाले, ‘शरद पवार यांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ निवडणुकीत उतरलो आहे. जिल्ह्यातील जनतेत मोठ्या प्रमाणात उठाव असून, जनतेच्या ताकदीवर ही निवडणूक लढत आहे. त्याचा परिणाम पाहायला मिळेल. शाहू, फुले, आंबेडकर, तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या या जिल्ह्याने पुरोगामी विचाराला प्राधान्य दिले आहे. या वेळी मला उमेदवारीची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात प्रवेश करताना तरुण, सामान्य शेतकरी आणि सातारकरांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. लोकांच्या मनात जे काही आहे, त्यातून हा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.’
मराठा समाजाची साथ मिळणार मराठा आरक्षणाचे वादळ तुमच्या पथ्यावर पडणार का? या प्रश्नावर शशिकांत शिंदे म्हणाले, 'मी मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चावेळी मुंबईत केलेली मदत ही स्वकर्तव्य म्हणून केलेली आहे. यातून कोणतीही अपेक्षा नव्हती. केवळ मराठा समाजाचाच असंतोष नाही, तर धनगर समाजाचा प्रश्न आहे. ओबीसींचा मुद्दा आहे. सध्याच्या सरकारने त्यांना न्याय दिला नाही. उलट वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे आता सर्वांना कळाले आहे. या सर्वांना एकत्र घेऊन मी पुढे जाणार आहे.'