साताऱ्याची जागा घड्याळ की कमळाला?

महायुतीच्या उमेदवाराचे घोंगडे अद्याप भिजत

| सातारा | वृत्‍तसंस्था |

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अवघे चार दिवस उरले असतानाही महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नसल्याने मतदारांबरोबरच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यासाठी दोन दिवस लागणार आहेत. त्यामुळे महायुतीची आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत साताऱ्याची जागा अजित पवार गट की भारतीय जनता पक्षाला तसेच उमेदवार कोण? यावर निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन महिना होत आला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार अर्ज भरण्याची प्रक्रियाही मंगळवारी (दि.12) पासून सुरू झाली आहे. बारामतीच्या एकाने उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. महाविकास आघाडीने आ. शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. आज पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत अर्जही भरला जाणार आहे. महायुतीच्या उमेदवाराचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून खा. उदयनराजे भोसले, पुरुषोत्तम जाधव, नरेंद्र पाटील यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर अजित पवार गटानेही ही जागा आपल्यालाच मिळावी, अशी आग्रही मागणी लावून धरली आहे. त्यांच्याकडून नितीन पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. उमेदवारी अजित पवार गट की भाजपला, हे ठरले नसले तरी खा. उदयनराजे भोसले या जागेसाठी भाजपकडून निवडणूक लढण्यास आग्रही आहेत. त्यासाठी त्यांची मुंबई व दिल्लीवारीही झाली.

दिल्लीत चार दिवस ठाण मांडल्यानंतर उदयनराजे साताऱ्यात आले. त्यावेळी त्यांच्या स्वागताचा मोठा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम झाल्यानंतर उदयनराजेंनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली. मतदारसंघातील बहुतांश गावांचा त्यांचा फेरा पूर्ण झाला आहे. त्यांच्याकडून उमेदवारी अर्जही नेण्यात आला आहे; परंतु आजही महायुतीच्या उमेदवारीचे कोडे सुटले नाही. महायुतीमध्ये सातारा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ समजला जातो. तो भाजपला पाहिजे आहे.

Exit mobile version