रायगडातील हापूसचा सातासमुद्रापार डंका

| पाली/बेणसे | वार्ताहर |

रायगडसह कोकणच्या हापूस आंब्याच्या चवीचा मोह जगाला पडतो. कोकणचा हापूस आंबा त्याच्या उत्तम चवीसाठी व अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध असलेल्या कोकणच्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे सद्यस्थितीत अनेक संकट उभी ठाकली आहेत. कोकणातील शेतकरी बॉण्ड फायटर असल्याने तो हवामानबदल, अस्मानी, नैसर्गिक संकटात देखील पुन्हा जिद्दीने उभा राहतो. राज्याच्या कानाकोपऱ्यात आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहचला. यामध्ये तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी यांची परवानग्या मिळवून द्यायला मदत झाली. अशावेळी सरकारकडून आंबा बागायतदाराला आवश्यक ती मदत ही मिळत नाही. ही शोकांतिका आहे. असे संदेश पाटील म्हणाले.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या ठिकाणी हापूस चे उत्पादन होते. यावर्षीचा विचार केला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूसचे उत्पादन अधिक आहे, तर अन्य जिल्ह्यात आंबा उत्पादनात घट झाली आहे. रायगडमध्ये 30 टक्के पेक्षा उत्पादन कमी आहेत. सध्या कीटक आणि रोगाचा प्रादुर्भाव अधिक परिणामकारक ठरत आहे. अनेक वर्षे करीत असलेल्या फवारण्या, रोग प्रतिबंधात्मक उपाय करतो, मात्र आता किटकात प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसते. फुलकीड ही छोटीशी कीड असून ती प्रचंड नुकसान करते. फवारणीचा सर्वाधिक खर्च फुल किड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी होतो. यावर्षी कोकणातील पाचही जिल्ह्यात फुलकिड्याने आंबा बागायती व्यापल्या आहेत. प्रशासनाला, कृषी विभागाला सूचना देऊन ही कोणतीही कृती दिसत नाही. त्यामुळे आंबा बागायतदार संकटात आहेत.हवामानाचा, उष्णतेचा आंबा उत्पादनाला फटका बसला असून कोकणातील आंबा बागायतदार संकटात असल्याचे दिसत आहे, असे संदेश पाटील म्हणाले.

कोकणातील पाच जिल्ह्यात जो आंबा पिकतो, तोच हापूस आंबा आहे. इतर ठिकाणचा आंबा हापूस नाही. इतर राज्यातील आंबा हापूस सदृश आंबा असतो. त्या आंब्याला हापुसचा स्वाद नसतो. आज अलिबाग पासून पनवेल पर्यंत रस्त्यावर विक्रीसाठी आंबा विक्रीस आला आहे. मात्र यात हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होते. हापूस आंब्याचा रंग, स्वाद आणि सुगंध यावरून ओळखता येतो. ग्राहकांनी आंबा विकत घेताना कोकणातील आंबा बागायतदार, शेतकरी यांच्याशी संपर्क साधून आंबा खरेदी करावा तसेच आम्ही जो जीआय टॅग मिळवला आहे ते पाहून आंबे घ्यावेत. आम्ही यावर्षी पासून पीआर कोड लावत असून ग्राहकांनी तपासून रिसर्च शोधून आंबे खरेदी करावेत असे आवाहन संदेश पाटील यांनी केले आहे.

रायगडातील हापुसचा सातासमुद्रापर डंका असून यामध्ये आखाती देश, युरोप, व अमेरिका यांचा समावेश आहे. या देशात हापूसला मोठी मागणी आहे. अशी माहिती संदेश पाटील यांनी दिली. राज्यातील आंब्याचे हापुसवर अतिक्रमण होत असल्याने कोकणच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. सध्या आंब्याची बागायत करणे आर्थिक दृष्ट्या कठीण बनले आहे. मजुरांचा खर्च परवडणारा नाही. परराज्यातील आंबा विक्रेते हे इंडियन मँगो म्हणून आंब्याची विक्री करतात, ते आंबा स्वस्त देतात, मात्र त्याला चव नसते. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापुसचे नाव बदनाम होत आहे. अशी चिंता संदेश पाटील यांनी व्यक्त केली. आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी आंब्याचे प्रकार सांगताना हापूस, केशर, राजापुरी पायरी, तोतापुरी, नीलम या आंबा जाती आहेत. एकूण नाव असलेल्या 243 जाती आहेत. न इतर राज्यात लंगडा बनारस, चौसा, बैगन पल्ली, लालबा या जाती आहेत. हापूस आंबा दर्जेदार व रुचकर असल्याने मागणी मोठी आहे.

Exit mobile version