म्हसळ्यात ठाकरेंकडून मोदी सरकारचा खरपूस समाचार
| आंबेत | वार्ताहर |
देश सत्यमेव जयतेच्या ब्रीदवाक्यावर चालत नसून, ‘सत्ता’मेव जयते हे भाजपचे ब्रीदवाक्य आहे, घराणेशाहीला विरोध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरेंना घरातील किती सदस्यांना पुन्हा उमेदवारी देणार आहेत, होऊनच जाऊद्या आता, अशा भाषेत शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेत ठाकरी शैली दाखवून दिली. आगामी काळात होणार्या निवडणुकांमध्ये विजय आपलाच असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनसंवाद मेळावा रायगड जिल्ह्यात शुक्रवार, दि 02 फेब्रुवारी रोजी शेवटच्या दिवशी म्हसळ्यात पार पडला. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि उपस्थित जनतेला संबोधित केले. या मेळाव्यात प्रचंड गर्दी आणि शिवसैनिकांचा अलोट सागर कोसळला होता. आपण मोदींच्या विरोधात नसून, हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत, त्यामुळे रायगडात मला याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही. कारण आता रायगडकर याच हुकूमशाहीला गाडून टाकतील, यावर माझा विश्वास असल्याचं प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केलं.
आगामी काळात होणार्या लोकसभेचा पुढील उमेदवार हे अनंत गीतेच असतील आणि त्यांना आपणा सर्वांची साथ लागणार आणि तुम्ही ती नक्कीच द्याल याची मला खात्री आहे, अशी विनंती त्यांनी उपस्थितांना केली. मी या देशातील देशद्रोह्यांच्या विरोधात असून मुस्लिमांच्या नाही, असा विश्वास त्यांनी हजारोंच्या संख्येने या जनसंवाद मेळाव्याला जमलेल्या मुस्लिम बांधवांना दिला. त्यामुले सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा शिवसेना आपला गड काबीज करण्यास पुन्हा एकदा सज्ज झाल्याचं पाहायला मिळालं. याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभेतील गटनेते आमदार अजय चौधरी, माजी खासदार अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार विनोद घोसाळकर, मिलिंद नार्वेकर जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के, किशोर जैन, रायगड संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, महिला संघटिका स्विटी गिरासे, रवींद्र लाड यांसह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.