लिआंग-वँगविरुद्ध संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पराभव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या चीनच्या लिआंग वेई केंग-वँग चँग जोडीने भारतीय जोडीचा 21-19, 18-21, 21-19 असा पराभव केला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने चीनच्या जोडीस तब्बल 1 तास 11 मिनिटे झुंज दिली. यंदाच्या हंगामात सात्त्विक-चिराग जोडी सहाव्यांदा अंतिम फेरीत खेळली आणि त्यांना प्रथमच पराभव पत्करावा लागला. लढतीमधील निर्णायक तिसऱ्या गेममध्ये 13-20 अशा पिछाडीवर असताना सात्त्विक-चिराग जोडीने सहा मॅच पॉइंट वाचवत 19-20 अशी रंगत निर्माण केली होती. मात्र, अखेरीस चिनी जोडी विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. या विजयाने चीनी जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सात्त्विक-चिरागकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली.