सात्विक-चिरागने रचला इतिहास

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारताची स्टार बॅडमिंटनपटूंची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची यशस्वी घौडदौड सुरू असून आता त्यांनी आणखी एक मोठा विक्रम केला आहे. त्यांनी सायना नेहवालचा विक्रम मोडला आहे.

सात्विकसाईराज आणि चिराग यांची जोडी पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी अव्वल क्रमांकावर गेले 10 आठवडे आपले स्थान कायम राखले आहे. त्यामुळे सात्विक आणि चिराग पहिलेच भारतीय बॅडमिंटनपटू ठरले आहेत, ज्यांनी 10 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. यापूर्वी सायना नेहवालने 18 ऑगस्ट ते 21 ऑक्टोबर 2015 दरम्यान सलग 9 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक टिकवला होता.

विशेष म्हणजे सात्विक आणि चिराग ही पहिली भारतीय पुरुष बॅडमिंटन जोडी आहे, ज्यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. सध्या सात्विक आणि चिराग यांचे 1,02,303 पाँइंट्स आहेत. त्यांच्यात आणि दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या कँग मिन ह्युक आणि सेओ सेउंग जे या जोडीमध्ये 5000 पाँइंट्सचा फरक आहे. सात्विकसाईराज आणि चिराग यांनी गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या स्पर्धा जिंकून भारताचा तिरंगा मानाने फडकावला आहे. त्यांनी इंडिया ओपन 2022 स्पर्धा जिंकल्यानंतर कामगिरीत सातत्य ठेवले आहे. त्यांनी भारताला ऐतिहासिक थॉमस कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

Exit mobile version