| बँकॉक | वृत्तसंस्था |
भारताच्या दोन जोड्यांनी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पाऊल ठेवले. सात्विक साईराज रंकीरेड्डी -चिराग शेट्टी या जोडीने पुरुष दुहेरीत; तर अश्विनी पोन्नाप्पा-तनीषा क्रॅस्टो या जोडीने महिला दुहेरीत अंतिम चारमध्ये पाऊल ठेवले.
सात्विक रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मलेशियाच्या जोडीवर मात केली. सात्विक-चिराग जोडीने जुनैदी अरीफ-रॉय किंग याप या जोडीवर 21-17, 21-14 अशी सहज मात केली. भारतीय जोडीने अवघ्या 38 मिनिटांमध्ये विजयाला गवसणी घातली.अश्विनी पोन्नाप्पा-तनीषा क्रॅस्टो या भारतीय जोडीने ली यू लीम-शिन चॅन या दक्षिण कोरियाच्या जोडीवर रोमहर्षक विजय नोंदवला. भारतीय जोडीने पहिला गेम 21-15 असा जिंकत आघाडी मिळवली, पण दक्षिण कोरियाच्या जोडीने दुसरा गेम जिंकत झोकात पुनरागमन केले.
दक्षिण कोरियाच्या जोडीने 23-21 अशी या गेममध्ये बाजी मारली. तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने जबरदस्त पुनरागमन केले. अश्विनी-तनीषा या जोडीने अखेरच्या गेममध्ये 21-19 असे यश मिळवले. दबावाखाली भारतीय जोडीने खेळ उंचावला व पुढल्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत निराशाभारताला दुहेरीत यश मिळाले असले तरी एकेरीत मात्र निराशेला सामोरे जावे लागले. पुरुषांच्या एकेरीत मेईराबा मेसनाम याची घोडदौड शुक्रवारी संपुष्टात आली. चौथा मानांकित कुनलावूत वितिदसर्ण याने मेसनाम याच्यावर 21-12, 21-5 असा सरळ दोन गेममध्ये विजय संपादन करीत अंतिम चारपर्यंत वाटचाल केली. मेसनाम याचा 34 मिनिटांमध्ये पराभव झाला.