चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक-चिरागची आगेकूच

| शिन्झेन | वृत्तसंस्था |

भारताचा प्रमुख बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय, तसेच आशियाई सुवर्णपदक विजेती जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चायना मास्टर्समध्ये पुरुष एकेरीत आव्हान कायम असलेला जागतिक कांस्य पदक विजेता प्रणॉय हा एकमेव भारतीय आहे. उपउपांत्यपूर्व लढतीत गुरुवारी त्याने 40 मिनिटांत डेन्मार्कच्या मॅग्नस जोहान्नसन याच्यावर 21-12, 21-18 असा विजय प्राप्त केला. या स्पर्धेत प्रणॉयला आठवे मानांकन आहे. अखेरच्या आठ खेळाडूंच्या फेरीत त्याच्यासमोर जपानच्या तृतीय मानांकित कोदाई नाराओका याचे आव्हान असेल.

पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सात्विक व चिराग यांना चायना मास्टर्समध्ये अव्वल मानांकन आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठत त्यांनी दुहेरीतील भारताचे आव्हान कायम राखले. आगेकूच राखताना त्यांनी जपानच्या अकिरा कोगा व ताईची साईतो जोडीवर 21-15, 21-16 असा विजय मिळवला. पुढील फेरीत इंडोनेशियाची लिओ रॉली कार्नांडो व डॅनिएल मार्टिन जोडी सात्विक-चिराग जोडीची प्रतिस्पर्धी असेल.

पुरुष एकेरीत जोहान्नसनविरुद्ध प्रणॉयने शानदार सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये त्याने 6-1 अशी मोठी आघाडी घेतली, नंतर डेन्मार्कच्या खेळाडूने पिछाडी 8-6 अशी कमी केली, नंतर 14-11 अशी स्थिती असताना भारतीय खेळाडूने सारा अनुभव पणाला लावत प्रतिस्पर्ध्याला दीर्घ साखळीमध्ये गुंतवले. जोहान्नसन दमल्याची संधी साधत प्रणॉयने पहिला गेम खिशात टाकला. दुसरा गेम जास्तच रंगतदार ठरला. दोन्ही खेळाडूंनी 15-15 अशी बरोबरी साधली, नंतर प्रत्येकी 18 गुण असताना प्रणॉयने निर्णायक टप्प्यावर मुसंडी मारत उपांत्यपूर्व फेरीतील जागा निश्चित केली.

Exit mobile version