पर्यटकांनी फुलला सवतकडा

| आगरदांडा | वार्ताहर |
वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी मुरुड तालुक्यातील निसर्गरम्य सवतकड्यावरील धरणावर मोठया प्रमाणात पर्यटक व स्थानिकांची येऊ लागले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी येथे फार मोठी गर्दी होऊ लागल्याने स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय वाढला आहे.

एका बाजूला उंचच्याउंच कडा, त्यातून फेसाळत खाली येणारे दुधाळ धबधबे, दुसर्‍या बाजूला धुक्याचे अच्छादन घेतलेले खोल दरी. हा निसर्गाचा नजराणा पाहताना स्वर्गसुखाचा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. इथला निसर्ग न्याहाळताना अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही .सृष्टी निर्मात्याने कोकणाला भरभरून निसर्गसौंदर्य बहाल केले आहे. विविधतेने नटलेला निसर्ग न्याहाळताना, डोळ्यात साठवताना डोळ्याचे पारणे फिटते. कोकण भुमीत जो कोणी येतो तो इथल्या निसर्गसौंदर्यांवर अक्षरशः फिदा होऊन जातो. पावसाळ्यात तर हे सौंदर्य आणखीनच खुलते. हिरवागार शालू पांघरलेले डोंगर, त्यातून अवखळपणे वाहणारे निर्झर, नागमोडी वळणे यामुळे निसर्गाचे सौंदर्य अगदी तिट लावल्यासारखे खुलते. रिमझिम पावसात पसरलेल्या दाट धुक्यात हरविलेले घाटातील रस्ते, खोल दरीतुन हळुहळु वर येणारी दाट धुक्क्याची चादर न्याहाळताना मिळणारे स्वर्ग सुख अनोखे आहे. निसर्गाची ही जादूई दुनिया पाहण्यासाठी पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते.

मुरुड तालुक्यातील सायगाव या गावांपासून सवतकडा धबधब्याच्या मार्गाला या तीन किमी अंतरावर सुरवात होते. घनदाट वृक्षराजीतून या रस्तावरुन जाता येते. रस्त्याच्या उजव्या बाजुला असलेल्या डोंगरातून खळखळ करत वाहणार्‍या दुधाळ धबधब्यांची रांग आपले लक्ष वेधून घेते. प्रत्येक धबधबा आपल्याला मोहीत करत असतो.जसजसे आपण रस्तावर जातो तसतसा थंड हवेचा झोका मन उल्हासीत करु लागतो. दरीत पसरलेल्या धाट धुक्यामुळे दरीत डोकावुन पाहीले तर काहीही दृष्टीस पडत नाही मात्र दरीतील धुकं जेव्हा वर येऊ लागते तेव्हा निसर्गाची चंदेरी चादर कुणीतरी वर घेऊन येत असल्याचा भास होतो. थोडे पुढे गेल्यावर उंच कड्यातून अवखळपणे कोसळणारे दुधाळ धबधबे आपले लक्ष वेधून घेतात. रस्त्यावरुन चालताना धबधब्याचे अंगावर उडणारे पाण्याचे तुषार रोंमांचित करतात. खळखळून वाहणारे हे दुधाळ धबधबे पाहिले की धबधब्याखाली बसुन चिंब भिजण्याचा मोह आवरता येत नाही. वावडुंगी ग्रामपंचायतीने सवतकडा धबधबावर जाण्याकरिता ऐरो दिल्यास व चांगला रस्ता बनवला तर यां निसर्गरम्य धबधबावर लाखोच्या संख्येने पर्यटक व स्थानिक नागरिक येऊ शकतात. पर्यटकांची संख्या वाढली तर स्थानिकांना रोजगार मिळु लागला आहे.

Exit mobile version