आप करणार लाक्षणिक उपोषण
| खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुका हा औद्योगिक दृष्ट्या प्रबळ मानला जातो. या ठिकाणी महावितरणची वीज वारंवार खंडित होत असल्याने नुकसानी होत आहे. खालापूर तालुक्याचे उज्ज्वल भविष्य करण्यासाठी या भीषण वीज संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना तसेच पुढील 10 वर्षाचे नियोजन यावर लेखी तांत्रिक माहिती द्यावी यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवारी (दि.11 जून) रोजी खालापूर तहसील कार्यालयासमोर सकाळी 10.00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत आपच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
मोडकळीस आलेले भंगार, सामुग्री, विद्युत पोल, ट्रान्सफॉर्मर, केबल, सद्यस्थितीतील सब स्टेशन खराब दर्जाचे असल्याने असंख्य वेळा वीज खंडित होऊन नुकसान होत आहे. सध्याचे वाढलेले वीज बिल, वेळोवेळी अनेक नागरिकांना दिली जाणारी अयोग्य बिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे खालापूर तालुक्यातील व्यापारी व जनता मानसिक व आर्थिक तोट्याने त्रस्त आहे. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम आदमी पार्टीने पुढाकार घेतला असल्याचे जांभळे यांनी सांगितले.
शहर व तालुक्याचे नुकसान यातून नक्कीच देशाचेही नुकसान होत आहे. विजेच्या समस्येने भविष्यात जनजीवन विस्कळीत होईल असे असताना अधिकारी वर्ग केवळ चालढकल करीत असून यावर ठोस तोडगा न काढल्यास आपच्या वतीने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल. संपूर्ण तालुक्यात विविध घटकांना सोबत घेऊन जनआंदोलनाच्या माध्यमातून तोडगा काढुया असे आवाहन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी केले आहे.