| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग-वडखळ रस्त्यावरील अवजड वाहतुकीचे नीट नियोजन करुन प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करण्याबरोबरच जनतेचे जीवही वाचवावेत, अशी मागणी माजी आ.पंडित पाटील यांनी केली आहे.
विकेन्डसह अन्य दिवशी अलिबाग-वडखळ रस्त्यावर होणार्या कोंडीवरुन पंडित पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले आहे. या मार्गावर आरसीएफ, गेल, एचपीसीएल या कंपन्यांची अवजड वाहतूक सातत्याने सुरु असते. जीवनाश्यक वस्तुंची वाहतूक असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सुचित केलेले आहे. पण ती वाहतूक करताना प्रशासनाने सर्वसामान्यांच्या जीवाकडेही गांभीर्याने पाहणे गरजेच असल्याचे त्यानी निदर्शनास आणले. आधीच हा रस्ता खूपच अरुंध आहे. त्यात अवजड वाहतुकीने सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असते. पर्यटकांचा ओघ दिवंसेदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे वाहतूक कोडीची समस्या दिवंसेदिवस वाढत चालली असल्याही त्यांनी सुचित केले.
ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने अवजड वाहतूक सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत पूर्णपणे बंद ठेवावी. तसेच सायंकाळी 4.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत या वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे, असे पर्याय त्यानी सुचविलेलेल आहेत. वाहतूक कोंडीने सर्वात मोठा त्रास हा रुग्णांना होत असतो. अलिबागचे सामान्य रुग्णालय व्हेंटीलेटरवर आहे. तेथे पुरेशा सुविधा नसल्याने एखाद्या रुग्णाला तातडीने पनवेल, नवी मुंबईला न्यायचे झाल्यास आधी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. गेल कंपनीने समुद्रामार्गे रुग्णवाहिका सेवा सुरु केली असे सांगितले मात्र त्याचा विनियोग कितीजणांना झालाय, अशी विचारणाही पंडित पाटील यांनी केली.
अलिबाग-विरार रस्ता झाला की या समस्या सुटतील असे प्रशासन सांगते. पण तो रस्ता नेमका कधी होणार यावर कुणीच काही बोलत नसल्याबद्दल पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्ग गेली 12 वर्षे रखडलेला आहे. तो अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. आधी ते करा, मग अलिबाग-विरार रस्त्याबाबत बोला, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे. सरकार म्हणते येथे जमिनीचे दर मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे त्या संपादित करताना अडचणी येतात, मग उद्योग आणताच कशाला, अशी विचारणाही त्यांनी केली. मुंबई, ठाणे, पुण्यात जशी विकासकामे करता तशी विकासकामे अलिबाग परिसरात का केली जात नाहीत. अलिबाग-वडखळ राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आम्ही केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे निदान अलिबाग-वडखळ रस्ता सिमेंट क्राँक्रीटचा रस्ता होऊ शकला, असा दावाही पंडित पाटील यांनी केला.
नागरिकांचे धन्यवाद
वाहतूक कोंडीबाबत कृषीवलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जाते. तसेच हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल अनेक नागरिकांना पंडित पाटील यांना धन्यवादही दिलेले आहेत. विद्यमान लोकप्रतिनिध रस्त्याच्या मुलभूत समस्यांकडे लक्ष देत नसल्याबद्दलली अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.