आमचा जीव वाचवा

चांदेपट्टी ग्रामस्थांची सरकारला आर्त हाक; प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त

। पेण । प्रतिनिधी ।

आमचा जीव वाचवा, अशी आर्त हाक पेण तालुक्यातील महलमिरा ग्रामपंचायत हद्दीतील चांदेपट्टीसह इतर वाड्यांवरील ग्रामस्थांनी मायबाप सरकारला दिली आहे. भूस्खलनाच्या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत, परंतु प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याने संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या चार-आठ दिवस आमचे स्थलांतर करत असाल, तर ते आम्हाला मान्य नाही. यापुढे जर आमचे बरे-वाईट झाले, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. यावर्षी आम्ही स्थलांतरीत होतो; परंतु पुढच्या वेळेला काही झाले तरी आम्ही स्थलांतरीत होणार नाही, अशा रोखठोक संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करीत चांदेपट्टीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला बजावले आहे.

गेली दोन दशक आपले जीव मुठीत घेऊन पावसाळ्यात महलमिरा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चांदेपट्टीसह इतर वाड्यांवरील ग्रामस्थ जगत असून, त्यांच्या वेदना प्रशासनाला समजत नाहीत. साधारणतः 20 ते 22 वर्षांपासून या भागामध्ये बॉक्साईडचे उत्खनन सुरू झाले. बॉक्साईड उत्खनन करणार्‍याने उच्च स्तरावरून सर्व परवानग्या आणल्या व आपले काम सुरू केले. मात्र, हे उत्खनन होत असताना कळत-नकळत याचा परिणाम डोंगरांवर होऊ लागला आणि गाडगीळ अहवालानुसार, सह्याद्रीच्या भूस्खलनाला कारणीभूत डोंगरामध्ये सुरू असणारे उत्खनन हेच आहे. जेव्हापासून बॉक्साईड उत्खननाला सुरूवात झाली, त्यानंतर एक-दोन वर्षांनीच मोठ्या प्रमाणात या भागामध्ये जमिनीला भेगा जाऊ लागल्या. पावसाळ्यात छोटी-मोठी दगड सरकू लागली. हा प्रकार गेली दोन दशके सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान प्रशासन आम्हाला तात्पुरते स्थलांतरीत करते, मात्र ज्यावेळी तात्पुरते स्थलांतरीत करते, त्यावेळी सात-आठ दिवस प्रशासन आमच्याकडे आवर्जून लक्ष देतो. मात्र, नंतर येरे माझ्या मांगल्या हाच प्रकार सुरू असतो, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यातच आमची शेती, पाळीव जनावरे गावातच असल्याने पुन्हा गावाकडे यावे लागते. या प्रकाराला अक्षरशः गावकरी त्रस्त झाले आहेत. गेली 10 ते 15 वर्ष हे पुनर्वसन करण्यासाठी सरकार दरबारात विनवण्या करीत आहोत. परंतु, पुनर्वसन काही होत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

भूस्खलनाची होण्याची भीती
तत्कालिन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवर दळणवळणाची योग्य सोय व्हावी व दरडग्रस्त गावकर्‍यांचे स्थलांतर व्हावे यासाठी 2020 मध्ये आपल्या वरिष्ठांना कळवले होते. परंतु, त्यानंतर आलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी याकडे लक्ष न दिल्याने आज अनेक ठिकाणच्या दरडग्रस्त भागाचे पुनर्वसन झालेले नाही. चांदेपट्टी विभागामध्ये जे बॉक्साईडचे उत्खनन आहे, याकडेदेखील प्रशासनाचे योग्य लक्ष नसल्याने उत्खननकर्ते मनमानेल तसे उत्खनन करत आहेत. बुल्डोझर, ब्रेेकरच्या सहाय्याने उत्खनन होत असल्याने डोंगराळ भाग ठिसूळ होत आहे. त्याचमुळे मोठमोठ्या भेगा जाऊन त्यामध्ये पाणी शिरून भूस्खलन होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version