खारफुटी तोडण्याची परवानगी द्यावी; अन्यथा शेतकरी उग्र आंदोलन करणार
। पेण । प्रतिनिधी ।
शासनाचे धोरण रायगडातील शेतकर्यांना आत्महत्या करण्यास भाग पडणार आहे. त्यामुळे शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी. अन्यथा शेतकरी उग्र आंदोलन करतील, असा इशारा वजा मागणी करणारे निवेदन पेण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे विनोद म्हात्रे, सी.आर.म्हात्रे विवेक जोशी यांनी सादर केले आहे.
पेण आणि अलिबाग हे दोन तालुके महाराष्ट्र राज्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखले जातात परंतु आजमितीला पेण आणि अलिबाग तालुक्यातील भात लागवडी क्षेत्रापैकी 30 ते 40 टक्केच क्षेत्रावर भात शेतीची लागवड केली जाते. उर्वरीत लागवडीच्या क्षेत्रावर खारफुटी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अशा वाढलेल्या खारफुटीमुळे शेती करणे अशक्य झाले आहे.
ही खारफुटीची झाडे तोडण्यासाठी शेतकर्यांनी हालचाल केली तर शासकीय अधिकारी शेतकर्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा बडगा उचलतात. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, जर शेतकर्यांनी काही करणास्तव एक ते दोन वर्ष शेती केली नाही तर त्या पिकत्या जमिनीमध्ये खारफुटीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात व पिकती शेती नापीक होते या झाडांना तोडण्यासाठी शासनाकडून कोणतीही परवानगी मिळत नाही आणि जर शेतकर्यांनी झाडे तोडण्याचा तसा प्रयत्न केला तर त्याच्यावर अजमीन पात्र गुन्हा दाखल केला जातो हे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जमिनीच्या सातबारावर भातशेती असा उल्लेख आहे. अशा जमिनीत जर खारफुटीची झाडे वाढली असतील तर ती झाडे तोडण्याची परवानगी शेतकर्यांना देण्यात यावी. जर तशी परवानगी शेतकर्यांना शासनाकडून दिली नाही तर भूमिपुत्र शेतकरी म्हणून पेण आणि अलिबाग तालुक्यातील खारेपाटामधील तरुणांना एकत्र घेऊन शासनाच्या विरोधात उग्र आंदोलन करावे लागेल. खारफुटीची झाडे खारबंदिस्तीच्या खाडीच्या बाजूला असतील तर आम्ही शेतकरी स्वतः त्याचे रक्षण करू पण ही झाडे आमच्या शेतात आली आणि आमची शेती नापिक झाली तर मुळासकट उपटल्याशिवाय राहणार नाहीत असेही निवेदनात म्हटले आहे.







