देश वाचवा, मोदी सरकार हटवा

जनआंदेालन संघर्ष समितीचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी |
केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील सर्वच घटकांची मोठी गळचेपी सुरु झाली असून,या सरकारच्याविरोधात जन आंदोलन संघर्ष समितीच्यावतीने विविध पातळ्यांवर जनआंदोलन सुरु करण्यात आलेले आहे.याचाच एक भाग म्हणून 9 ऑगस्टला क्रांतीदिनी देश वाचवा,मोदी सरकार हटाव अशी हाक दिली जाणार आहे. 9 ऑगस्टला क्रांती मैदान मुंबई येथे,सायंकाळी 4 वाजता तर इतर 35 जिल्हे व 400. ठिकाणी, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय येथे संयुक्त पणे निदर्शने करण्यात येणार आहेत.

जनआंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय निमंत्रक कॉ.डॉ.अशोक ढवळे,साथी मेधा पाटकर, साथी प्रतिभा शिंदे,श्री.राजू शेट्टी,कॉ.सुकुमार दामले यांनी याबाबत संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.त्यामध्ये मोदी सरकारकडून शेतकरी,कामगार,असंघटित घटक,महिला आदी घटकांवर होणार्‍या अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.शिवाय नोटबंदी,कोरोनाची साथ,लॉकडाऊन आदी कारणांमुळे देशातील सर्वसामान्यांची झालेल्या हलाखीला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे, अशा परिस्थितीत दुसर्‍यांदा भारत वाचवा दिनाकरता 9 ऑगस्टच्या तयारीला लागले पाहिजे असे आवाहनही याद्वारे करण्यात आले आहे.

सर्व शासकीय कामे, न्यायालये यांवर निर्बंध आहेत तर दुकाने, आहारगृहे चालू आहेत. याचे कष्टकरी वर्गावर वाईट परिणाम होत आहेत. हे निर्बंध काढावेत, पण विनामूल्य लसीकरणाला प्राधान्य द्यावे.अशी मागणीही यानिमित्ताने करण्यात आली आहे. अशी माहिती कॉ.नामदेव गावडे, कॉ.किशोर ढमाले,कॉ.एम.ए.पाटील. डॉ.एस.के.रेगे, कॉ.लता भिसे-सोनावणे, वाहरु सोनवणे, कॉ.ब्रायन लोबो, हसीना खान, फिरोज मिठीबोरवाला, साथी सुभाष लोमटे, कॉ.सुभाष काकुस्ते, विलास भोंगाडे, कॉ.अजित पाटील, कॉ. विजय कुलकर्णी , मानव कांबळे, श्याम गायकवाड,वैशाली भांडवलकर, अ‍ॅड.राजेंद्र कोरडे,विश्‍वास उटगी, उल्का महाजन, कॉ. अरविंद जक्का,साथी संजीव साने यांच्यावतीने देण्यात आली आहे.

Exit mobile version