सावित्रीमाई घरट्यात आली, सर्व हिरावून चिखल ठेवून गेली! महाडकरांची व्यथा !

नजर टाकावी तिकडे फक्त चिखल आणि चिखलाचे साम्राज्य
अलिबाग | भारत रांजणकर |
सावित्रीच्या कुशीत वसलेल्या महाडकरांना सावित्रीचा पूर नवीन नाही. मात्र यावेळी आलेला पूर कित्येक वर्षे महाडकरांनी अनुभवलेला नाही. दरवर्षी पुराचे पाणी शहरात घुसते मात्र 4 ते 5 फुटांपर्यंत आलेले पाणी काही वेळाने ओसरते देखील. यावेळी मात्र सावित्री ने 12 ते 15 फुटांपर्यंत आपली खूण सोडल्याचे पहायला मिळत आहे. अनेकांनी 15 फुटांपर्यंत पाणी अनुभवल्याचे सांगितले. प्रचंड नुकसान सोसलेले महाडकर कृषीवल जवळ व्यक्त होताना म्हणाले की, सावित्रीमाई माहेरवाशिणी सारखी राहायला आली. पण जाताना आमचे सारे काही हिरावून घेऊन गेली. जाताना पाऊलखुणा म्हणून सर्वत्र चिखल मात्र ठेवून गेली.
महाड शहरात प्रत्यक्ष भेट दिल्यावर तितके दृश्य भयाण होते. नागरिकांचे चिखलाने माखलेले कपडे, चिखल उजालेल्या भकास चेहर्‍याने प्रत्येकजण घरातील, दुकानातील चिखल काढण्याचे काम करीत होते. महाड बसस्थानकातील गाड्या एकमेकांवर येऊन पडल्या होत्या, यावरुन पाण्याची उंची किती होती याची कल्पना केल्यावर अंगावर काटा उभा राहिला. सर्वांचे चेहरे निर्विकार, सरुन गेल्या संकटातून जीवंत वाचल्याचे समाधान आणि गेलेले संसार पाहुन दु:खी चेहरे, महाडकरांच्या अंतकरणात विचारांचे नक्की कोणते गोंधळ सुरु आहे, याची कोणतीच कल्पना करणे शक्य नव्हते. घातली. दोन दिवस पुराच्या पाण्यात वावरत असताना आणि सावित्री नदीच्या कुशीतच असलेल्या महाडकराच्या घरात प्यायला देखील पाणी उरलेले नाही. आधी पुराचे पाणी आणि आता पिण्याच्या पाण्यासाठीही महाडकरांना संघर्ष करावा लगत असल्याचे दिसून आले.
रस्तावरच कचर्‍याचे ढिगारे आहेत नळाला पाणी नाही, वीज नाही, घरातील धान्य, कपडे भिजलेले, अंगावर काय घ्यायचे आणि घरातील स्वच्छता करण्यासाठी उर्जा येण्यासाठी काय खायचे हा मोठा प्रश्‍न लहान बालकांपासून वयोवृद्धांना पडलेला आहे. शनिवारी पूर आणि पावसाचा जोर ओसरल्यानंतर घरातील सर्वांचीच लगबग सुरु झालेय. कोणालाही सवडीने एकमेकांशीही बोलण्यास वेळ मिळत नाही. प्रत्येकजण आपल्या धंद्याची आणि शिल्लक असलेल्या संसाराची बेरीज करण्यात गुंतलाय. नगरपालिका, सामाजिक संस्थां यांचे माणस मदत करीत आहे; मात्र ही मदत आलेल्या संकटासमोर खूपच तोकडी पडतेय.

1 / 7

सावित्री कोपली
महाड शहर दोन दिवसांपेक्षा जास्तकाळ पाण्याखाली होते. तळ मजला आणि पहिल्या मजल्यावरील कुटुंबांचे संसार उद्ध्वस्थ झालेत. चिखल, पाण्याने भिजलेले धान्य, कपड्यांचे ढिगारे रस्त्यावर रचले जात आहेत. ते बाजूला करण्यासाठी नगरपालिकेच्या माणसांना वेळ मिळत नाही. शंकर चालके यांचे कुटुंब भिजलेल्या धान्याच्या ढिगार्‍यासमोर उभे राहून डोळ्यातून आश्रू गाळीत होते. ज्या सावित्री नदीमुळे महाड शहर येथे वसले, तीच सावित्री आज कोपली होती. सावित्रीचे एवढे रौद्र रुप कधीही त्यांनी पाहिले नव्हते.

पुरानंतर येथे रोगराई येण्याची शक्यता आहे, त्यामुळे वयोवृद्धांसह गरोदर महिला, लाहान बालके, कोरोना बाधीत महाड शहर सोडून चालले आहेत. वाहने नादुस्त होण्याची गंभीर समस्या येथे निर्माण झालेली आहे. काही हुशार नागरिकांनी आपली वाहने महामार्गावर आणून ठेवली आहेत; परंतु या ठिकाणी काहींनी आधीच गायी, म्हशी, बकर्‍या पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी आणून ठेवल्या होत्या. अनेकांना आपली वाहने महामार्गवर आणता आली नाहीत, त्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहून गेली. दारात उभी केलेली गाडी आता कुठे जाऊन अडकलेय याचा शोध करावा लागतोय. काहींना आपला व्यवसाय नव्याने सुरु करणे खुपच कठीण आहे. योगेश चणामार्टचे मालक योगेश मोरे आपल्या कुटुंबासह दुकानातील चिखल आणि पाण्याने भिजलेले साहित्य बाहेर काढत होते. थोडेसे बोलल्यानंतर तेही हातात भांड घेऊन चिखलातला संसार सावरु लागले.
आम्ही ज्यावेळी महाडमध्ये प्रवेश केला त्यावेळी पुराचे सर्व पाणी ओसरुन पाच तास झाले होते. तरीही पुराच्या पाऊलखूणा पदोपदी दिसत होत्या. बुधवारी रात्री पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने सावित्रीचे पाणी वाढू लागले होते. मात्र, याची कोणतीही माहिती येथील नागरिकांना नव्हती. नेहमीप्रमाणे पाणी वाढेल आणि कमी होईल अशी अटकळ बांधून राहलेल्या महाडकरांना तब्बल 48 तास पुराच्या पाण्यात अडकून रहावे लागले. गुरुवारची रात्र महाडकरांसाठी धोक्याची ठरली. सावित्रीचे पाणी कधी दरवाजापर्यंत पोहचले हे शिवाजी चौकातील नागरिकांना समजलेच नाही. अगदी दुसर्‍या मजल्यापर्यंत हे पाणी पोहचले होते. त्यामुळे सामानाची आवराआवर करण्याची संधीच मिळाली नाही.

Exit mobile version