एसबीए कप सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा

चैतन्य, निक्षेप, सुदीप यांना विजेतेपद

। पुणे । वृत्तसंस्था ।

चैतन्य खरात, निक्षेप कात्रे, सुदीप खोराटे यांनी सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप जिल्हा सुपर-500 मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या गटातील विजेतेपद पटकावले.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीएमबीएचे मानद सरचिटणीस सीए रणजीत नातु, संयुक्त सरचिटणीस सीए आनंद जोशी, स्पर्धा सचिव राजीव बाग, सुधांशू बॅडमिंटन अकॅडमीचे संस्थापक सुधांशू मेडसीकर यांच्या उपस्थितीत झाले. विजेत्यांना ट्रॉफी आणि रोख पारितोषिके देण्यात आली.

या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित चैतन्य खरातने दुसर्‍या मानांकित प्रणव गावडेचे आव्हान 21-17, 19-21, 21-9 असे परतवून लावले आणि विजेतेपद पटकावले. यानंतर 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत सुदीप खोराटेने बाजी मारली. सुदीपने अंतिम फेरीत ओजस जोशीवर 21-14, 16-21, 21-10 असा विजय मिळवला. निक्षेप कात्रेने 17 वर्षांखालील मुलांच्या गटात बाजी मारली. त्याने अंतिम फेरीत श्रेयस मासलेकरवर 21-14, 21-17 असा विजय मिळवला. स्पर्धेतील 15 वर्षांखालील मुलांच्या गटात तनिष्क आडेने विजेतेपद मिळवले. त्याने अंतिम फेरीत चिन्मय फणसेवर 21-23, 21-16 21-15 असा झुंजार विजय मिळवला. स्पर्धेतील 13 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत एस. सोमजीने जेतेपद निश्‍चित केले. त्याने दुसर्‍या मानांकित हृदान पाडवेला 21-16, 21-5 असे नमविले. यानंतर 11 वर्षांखालील मुलांच्या गटात अर्चित खानदेशेने तीन गेमपर्यंत चिवट लढा देऊन बाजी मारली. त्याने वेदांत मोरेवर 8-21, 16-21, 23-21 अशी मात केली आणि विजेतेपद पटकावले.

शरदचंद्र छावलीने या स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला. त्याने स्पर्धेतील 40 आणि 45 वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील 45 वर्षांखालील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत शरदचंद्र छावलीने सत्यजित तरडलकरवर 21-14, 20-22, 23-21 अशी मात करून विजेतेपद मिळवले. यानंतर 40 वर्षांखालील गटात शरदचंद्रने आशिष शेरॉनवर 21-19, 22-20 असा विजय मिळवला.

Exit mobile version