ग्रामस्थांनी वनविभागाकडे केले सुपूर्द
| पाली/वाघोशी | वार्ताहर |
माणगावमधील खांदाड येथे शुक्रवारी (दि.18) रात्रीच्या सुमारास भरवस्तीत दुर्मिळ खवले मांजर आढळून आले. येथील तरुणांनी प्रसंगावधान राखत खवले मांजराचे रक्षण करत वनविभागाकडे सुपूर्द केले. यावेळी वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी खवले मांजराबद्दल तरुणांना मार्गदर्शन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील राजू पवार यांना खांदाड वस्तीलगत विचित्र वन्यजीव जमिनीवर दिसून आला. ही बाब त्यांनी तेथे उपस्थित असणाऱ्या गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. ग्रामस्थांनी त्वरीत माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना संपर्क साधला. शंतनु कुवेसकर यांनी वनविभागालादेखील याबद्दल त्वरित माहिती दिली. वनरक्षक येथे पोहोचेपर्यंत जमलेल्या सर्व तरुणांना व ग्रामस्थांना खवले मांजर या प्राण्याची ओळख पटवून देत या प्राण्याबद्दल जनजागृती करत शंतनू कुवेसकर यांनी जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेंद्रकुमार जाधव व सहाय्यक उपवनसंरक्षक रोहित चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या सूचनेप्रमाण वनपाल डी.एस. सुभेदार, वनरक्षक वैशाली भोर, पवन चौधरी, संतोष पिंगळा, राणी लिंबोरे, विवेक जाधव यांच्यामार्फत पुढील योग्य ती कार्यवाही करून खवले मांजराला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
पूर परिस्थितीचा परिणाम
खांदाड गावात व गावाच्या आजूबाजूच्या परिसरात खवले मांजर कायमस्वरूपी राहण्यायोग्य कोणताही नैसर्गिक अधिवास उपलब्ध नाही. त्यामुळे हे खवले मांजर सध्याच्या पूर परिस्थितीमध्ये काळ नदीच्या पूर प्रवाहात पश्चिमेकडील घनदाट जंगलांच्या पट्ट्यातून कुठून तरी वाहून येथे आल्याची शक्यता वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी वर्तवली आहे.
इंडियन पँगोलिन म्हणजेच खवले मांजर. हा जीव जगातील सर्वात जास्त तस्करी होणारा प्राणी असून, खूप संवेदनशील आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यात त्याला सर्वोच्च दर्जाचे स्थान तसेच सर्वोच्च दर्जाचे संरक्षण प्राप्त आहे. या वन्यजीवाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता खांदाड गावच्या ग्रामस्थांनी त्याचे रक्षण करून वन्यजीव संरक्षणाचे अतिशय स्तुत्य कार्य केले आहे.
– शैलेंद्रकुमार जाधव, उपवनसंरक्षक