| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
वारगाव येथील खवले मांजराची तस्करी करून विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी रविवारी ताब्यात घेतले. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तसेच एक खवले मांजर व महिंद्रा पिकअप गाडीही संशयित आरोपींकडून ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली. संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता 6 डिसेंबरपर्यंत वनकोठडी देण्यात आली.
विशाल विष्णू खाडये (34, रा.लोरे नं. 1, ता. कणकवली), संदीप तानाजी घाडी (44, रा. मुटाट ता. देवगड), गिरीधर लवू घाडी (41, रा. मुटाट, ता. देवगड), गुरुनाथ धोंडू घाडी (50, रा. मुटाट ता. देवगड) अशी संशयितांची नावे आहेत. तर यात एक अल्पवयीन संशयित आहे. रविवारी दुपारी वन अधिकार्यांना खवले मांजर विक्रीसाठी घेऊन काही लोक वारगाव येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन सावंतवाडी व वनक्षेत्रपाल कणकवली यांच्या अधिनस्त कर्मचारी यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी सापळा रचला. वनविभागाच्या पथकाला मुंबई-गोवा महामार्गावरील वारगाव येथील राजस्थानी ढाबा या ठिकाणी संशयित महिंद्रा पिकअपसह एक वन्यप्राणी खवले मांजरासह मिळून आले. अधिक चौकशीअंती त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी, कोल्हापूर येथील दक्षता पथकाचे विभागीय वन अधिकारी सं.नि. वाघमोडे, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी सुनील लाड, वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन सावंतवाडीचे सचिन शिडतुरे, महेश पाटील, वनपाल सावळा कांबळे, सर्जेराव पाटील, धुळू कोळेकर, वनरक्षक प्रमोद जगताप, विष्णू नरळे, सचिन पाटील, सिध्दार्थ शिंदे, सुखदेव गळवे, ब्रम्हकुमार भोजने, कोमल करकुड, दीपाली पाटील व इतर वन कर्मचारी यांनी केली. पुढील तपास वनक्षेत्रपाल कणकवली व त्यांचे अधिनस्त कर्मचारी करत आहेत.