पोस्ट ऑफिसमध्ये लाखोंचा अपहार

| चिपळूण | प्रतिनिधी |

चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे येथील पोस्ट ऑफिसमध्ये 2 लाखांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 18 डिसेंबर 2017 ते 7 नोव्हेंबर 2018 तसेच 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडली. याप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर यशवंत रहाटे (रा. मुर्तवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर याबाबतची तक्रार गुहागर उपविभाग शृंगारतळीचे डाकघर निरीक्षक हिमांशु जोशी यांनी सावर्डे पोलीस स्थानकात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर रहाटे हा मुर्तवडे शाखा डाकघर येथे कार्यरत होता. यावेळी पोस्टाचे खातेदार रामचंद्र महादेव मांडवकर व वासंती रामचंद्र मांडवकर (दोघेही रा. मुर्तवडे) यांची पाच वर्षे मुदतीची खाती न उघडता बोगस पासबुक तयार करून दोन लाख रूपये रक्कमेचा अपहार केला आहे. ही बाब पोस्ट खात्याच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधिताने दोन लाखाची ठेव व त्यावर मिळणारे व्याज असे एकूण 3 लाख रूपये डाक विभागाकडे भरणा केले. मात्र खातेदारांची खाती न उघडता दोन लाखांच्या फसवणूक प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

Exit mobile version