सायबर भामटयांकडून नोकरी शोधणाऱ्यांची फसवणूक

घटनांत चौपट वाढ

| मुंबई | वृत्तसंस्था |

अर्धवेळ नोकरी किंवा घरबसल्या अर्थार्जनाची संधी देण्याचे आमिष दाखवून पाठवलेल्या इंटरनेट लिंकच्या मदतीने समोरच्या व्यक्तीच्या बँकखात्यातील रक्कम हडपण्याचे प्रकार वाढत आहेत. नोकरी किंवा उत्पन्नाचे पूरक साधन शोधण्याचे प्रमाण वाढल्याचे हेरून अशा व्यक्तींची फसवणूक केली जात आहे. मुंबईत गेल्या वर्षभरात घडलेल्या अशा गुन्ह्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट वाढल्याचे दिसून आले आहे.

बोरीवलीतील 27 वर्षीय तरुणीने 2 नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर एक चित्रफीत पाहिली होती. त्यात अर्धवेळ नोकरी करा आणि कमवा अशी जाहिरात करण्यात आली होती. तरुणीने ती जाहिरात पाहून चित्रफिती खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. तिला शेअर चार्टमध्ये चित्रफीत लाईक करण्याचे काम सांगण्यात आले. सुरुवातीला तिला दोन-तीन वेळा केलेल्या लाइकचा मोबदला देण्यात आला. त्यानंतर ‌‘प्रीपेड टास्क’च्या नावाखाली ठरावीक रक्कम भरून त्या मोबदल्यात अधिक रक्कमही तिला देण्यात आली. तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर भामटयांनी तिला अधिकाधिक रक्कम भरायला सांगितली. तिने अधिक फायद्याच्या मोहात नऊ बँकांमधील खात्यांमध्ये साडेचार लाख रुपये जमा केली. मात्र, ती रक्कम तिला मिळालीच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने बोरिवली पोलीस ठाणे गाठले.

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये (ऑक्टोबपर्यंत) 362 गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी याच काळात फक्त 92 गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे नोकरीच्या नावाखाली फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सुमारे चार पटींनी वाढ झाली आहे. गुन्हा उकल होण्याचे प्रमाण केवळ 14 टक्के आहे. यावर्षी ऑक्टोबपर्यंत दाखल 362 गुन्ह्यांपैकी केवळ 51 गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यात 99 आरोपींना अटक केली आहे. गेल्या वर्षी दाखल 92 गुन्ह्यांपैकी केवळ 4 गुन्ह्यांची उकल झाली होती. त्यात 22 जणांना अटक झाली होती.

फसवणूक कशी केली जाते?
सुरुवातीला व्हॉट्सॲपद्वारे अर्धवेळ नोकरीबाबतचा संदेश पाठवला जातो. त्याला फसवणूक संदेशावरील लिंक क्लिक केल्यानंतर सुरुवातीला काही व्हीडिओ लाईक करायला सांगितले जातात. ते केल्यानंतर 50-100 रुपये खात्यात जमा केले जातात. त्याद्वारे विश्वास संपादन करून मोठया गुंतवणुकीचे आमिष दाखवले जाते. त्याला बळी पडल्यानंतर गुंतवणूक अथवा बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले जाते. त्याबद्दल थोडा मोबादलाही दिला जातो. असे करून लाखो रुपये काढले जातात.
खबरदारी घेणे गरजेचे..
ऑन लाईन अर्धवेळ नोकरीच्या आमिषाला बळी पडुन नका. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या व्हॉटसॅप संदेश किंवा एसएमएसव्दारे प्राप्त प्रलोभनाला प्रतिसाद देवु नये. एखादा व्हीडिओ पाहणे व त्याबदल्यात पैसे कमविणे हा सापळा आहे, त्यापासून दूर राहणेच योग्य आहे. अशा प्रकारे अर्धवेळ नोकरीसाठी गुंतवणूक सुरू केली असल्यास ती तात्काळ थांबवा. फसवणूक झाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार करा.
Exit mobile version