विमानतळ नोकरीच्या नावाखाली खोट्या जाहिरातींचा सुळसुळाट

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये होणार असल्याने रोजगाराच्या नावाखाली खोट्या जाहिरातींचा बाजार नवी मुंबई व पनवेलमध्ये सुरू आहे. विमानतळमध्ये नोकरी लावतो, प्रशिक्षण मिळवून देतो, असे दावे करून उमेदवारांची फसवणूक होत आहे. यामुळे रोजगाराच्या आशेने धावणाऱ्या तरुणांनी सावधान राहावे, असे आवाहन संबंधित अधिकृत कंपन्यांना करावे लागत आहे.

विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाची तयारी सुरू असून अदानी समूह आणि सिडको यंत्रणा काम करत आहेत. प्रकल्पग्रस्तांना सेवा क्षेत्रात प्राधान्याने रोजगार मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त 27 गाव समितीसह लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. अदानी समूहाने सध्या विमानतळाच्या स्वच्छता व सुविधा विभागासाठी बीव्हीजी कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीमार्फतच प्रशिक्षण आणि रोजगाराची निवड होणार आहे. उमेदवारांनी खोट्या जाहिरातींना बळी पडू नये, त्याऐवजी अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन बीव्हीजी कंपनीने केले आहे. काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक खोटी जाहिरात व्हायरल झाली. यात विमानतळात नोकरीसाठी अर्ज मागविले जात असल्याचे नमूद होते. बीव्हीजी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही जाहिरात फसवी असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही स्वतंत्र एजंट किंवा संस्थेमार्फत भरती करत नसून, 88 उमेदवारांच्या यादीनुसारच प्रशिक्षण व रोजगार दिला जात असल्याचे व्यवस्थापक विपेन टिक्कू यांनी सांगितले.

Exit mobile version