| अलिबाग । प्रतिनिधी ।
दोन महिला सफाई कामगारांनी फिनेल प्यायल्याची घटना अलिबागमध्ये बुधवारी दुपारी घडली. दोघींनाही अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दुपारी काम वाटून घेण्यावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार केल्याची माहीती समोर येत आहे.
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता राखण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. यामध्ये काही महिला साफ सफाईचे काम करीत आहेत. बुधवारी दुपारी दोन महिला कामगारांचे काम वाटण्यावरून किरकोळ वाद झाला. हा वाद विकोपाला पेटला. एकमेकांची मारहाण झाली. त्या रागाच्या भरात दोघींनी फिनेल प्यायल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवमाने यांना विचारणा केली असता वैयक्तीक वादावरून भांडण झाले असून त्यांनी फिनेल फक्त तोंडाला लावले परंतु सुरक्षेच्या दृष्टीने निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.