। पुणे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 9 फेब्रुवारी 2025 रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड अशा सात माध्यमांमध्ये घेतली जाते. परीक्षेसाठी सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी पेपर एकमधील गणित विषयाची आणि पेपर दोनमधील बुद्धिमत्ता चाचणी विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. पाचवी आणि आठवीसाठी 50 गुणांची प्रथम भाषा, 100 गुणांची गणिताची अशी एकूण 150 गुणांची परीक्षा सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत होणार आहे. तर 50 गुणांची तृतीय भाषा, 100 गुणांची बुद्धिमत्ता चाचणीसाठीची 150 गुणांची परीक्षा दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत होणार आहे.
या परीक्षेसाठी 50 रुपये प्रवेशशुल्क आणि 150 रुपये परीक्षा शुल्क असून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर, विलंब शुल्कासह 1 ते 15 डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह 16 ते 23 डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. मात्र, 31 डिसेंबरनंतर परीक्षा अर्ज भरता येणार नाही.