महाराष्ट्रातील उदयोन्मुख व्हॉलिबॉल खेळाडूंसाठी दत्तक योजना
| गडचिरोली | वृत्तसंस्था |
व्हॉलिबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील (कोल्हापूर) यांच्या दिशा अकॅडमी, बाचणी (जि. कोल्हापूर) आणि भारतीय व्हॉलिबॉलप्रेमी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील उदयोन्मुख व्हॉलिबॉल खेळाडूंसाठी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट 10 खेळाडू निवडून त्यांना दरमहा 3 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
खेळाडूंची निवड शारीरिक क्षमता चाचणी घेऊन केली जाणार आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटातील खेळाडूंची यात निवड केली जाणार आहे. संबंधित खेळाडू 31 डिसेंबर 2024 रोजी 14 वर्षांपेक्षा कमी आणि 12 वर्षांपेक्षा जास्त असावा. निवडलेल्या खेळाडूंच्या पालकांचे संमतीपत्र गरजेचे आहे. निवड झालेल्या खेळाडूंना व्हॉलिबॉल खेळाबरोबरच शालेय शिक्षण दिले जाणार आहे. हे खेळाडू दिशा अकॅडमी येथे निवासी संकुलात प्रवेशित केले जातील. त्यांना शास्त्रशुद्ध क्रीडा मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण आणि सकस आहार दिला जाणार आहे.
राज्य संघटना आणि शासकीय क्रीडा स्पर्धेतही त्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना भारतीय सैन्य दल, पोलिस दल, रेल्वे, इन्कम टॅक्स, एक्साईज, एल. आय. सी. आदी ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 8411944241 वर संपर्क करावा, असे आवाहन दिशा अकादमीचे संचालक अजित पाटील यांनी केले आहे.