। सुधागड-पाली । वार्ताहर ।
स्वदेस फाउंडेशनतर्फे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना आणली आहे. यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होणार आहे.
रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशन संस्थेच्यावतीने रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड या तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे प्रकल्प गाव विकास समितीच्या सहकार्यांमधून राबविले जात आहेत. स्वदेस शिष्यवृत्ती योजना हा या उपक्रमाचाच एक भाग आहे. मागील अनेक शैक्षणिक वर्षांमध्ये स्वदेस फाउंडेशनच्या मदतीने 554 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊन त्यांची उच्य शिक्षणाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. स्वदेस फाऊंडेशन मार्फत आव्हान करण्यात आले आहे की, जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी तालुका प्रतिनिधी म्हसळा, सुधागड, श्रीवर्धन – राकेश पवार 8668637713, महाड, पोलादपूर- विनोद पाटील 9272006743 व माणगाव, तळा- दीप्ती खैरे 9145923401 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.