| महाड | प्रतिनिधी |
भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची भयंकर घटना महाड तालुक्यातील धामणे बौद्धवाडी येथे घडली आहे. समर मंगेश प्रभाकर असे या मुलाचे नाव असून, तो गावातील प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. शाळेतून दुपारच्या सुट्टीत घरी येत असताना 5 ते 6 भटक्या कुत्र्यांची झुंड त्याच्या अंगावर धावून आली. तो घाबरून पळत असताना कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करून पकडून त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी दंश घेतल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जे-जे रुग्णालय, मुंबई येथे हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.