स्कूल बस खड्ड्यात; वाहतुकीची कोंडी

। पनवेल । प्रतिनिधी ।

खारघर वसाहतीमधील सेक्टर-7 परिसरात महानगर गॅस कंपनीकडून भूमिगत गॅस वाहिनी टाकण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतूक कोंडी झाली. त्याचवेळी स्कूल बस रस्त्यावरील खड्ड्यात अडकल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

फेज-1 परिसरात महानगर गॅस कंपनीकडून अनेक दिवसांपासून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, काही ठिकाणी खड्डे उघडेच असल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटने दरम्यान शाळेची बस खड्ड्यात अडकल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतूक संथ झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांची योग्य दुरुस्ती होत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच, खोदकाम पूर्ण झाल्यानंतर रस्ते तातडीने पूर्ववत करावेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version