। पुणे । प्रतिनिधी ।
राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिवाळी सुट्ट्या पुन्हा वाढवून मिळणार आहेत. दिवाळीच्या सुट्या कमी झाल्या असल्यास दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे असणार्या सुट्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) झाल्यानंतर घेता येतील, असे नमूद केलेले नवीन परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या घेता येणार आहेत.
राज्यात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) परीक्षा 12 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या कमी झाल्या असतील तर दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे असणार्या सुट्ट्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा झाल्यानंतर किंवा नाताळच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन समायोजित कराव्यात, असा आदेश जारी करण्यात आला आहे.