शाळेची माहिती एका क्लिकवर

विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने सॉफ्टवेअर विकसित
| पनवेल । वार्ताहर ।
विद्यार्थी सुरक्षितताय विद्यार्थी हिताय हे ब्रीदवाक्य घेऊन पनवेल विद्यार्थी वाहक संस्था काम करत आहेत. संस्थेचे सभासद असणारे स्कूल व्हॅन, चालक, विद्यार्थी व शाळेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. यासाठी वेब प तयार करण्यात आला आहे. माहिती संकलित करून सर्व डाटा हायटेक पद्धतीने उपलब्ध करण्याचा हा वस्तूपाठ संस्थेने इतरांसमोर ठेवला आहे.

पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी शिक्षण संस्था आहेत. या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. सुरक्षित विद्यार्थी वाहतूक, थेट घरापर्यंत सेवा, तुलनेत कमी शुल्क यामुळे स्कूल व्हॅन ला विशेष प्राधान्य दिले जाते. यामधून शाळेत ये जा करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे. पनवेलमधील बहुतांशी स्कूल व्हॅन चालक पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या अखत्यारीत संघटित झाले आहेत. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गणवेशा बरोबरच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, व्यसनमुक्तता, सर्व कागदपत्रांची पूर्तता त्याचबरोबर शिस्त या अनेक गोष्टींचे पालन करणार्‍यांना संस्थेचे सभासदत्व दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम करणारे पांडुरंग हुमणे पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेचे नेतृत्व करीत आहेत.

स्कूल व्हॅन चालकांचे हित आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा प्रमुख हेतू आणि उद्देश घेऊन हुमणे आणि त्यांचे संस्था कार्यरत आहे. आजच्या घडीला या संस्थेच्या अखत्यारीत अडीचशे पेक्षा जास्त स्कूल व्हॅन आणि बसेस विदयार्थी वाहतुक करीत आहेत. हजारो विद्यार्थ्यांची ने आण या व्हॅनमधुन केली जाते. संस्थेकडे सर्व गाड्यांचे कागदपत्र, फिटनेस सर्टिफिकेट, परवाने त्याचबरोबर वाहन चालकाचा बायोडाटा विद्यार्थ्याचे नाव, त्याचा रूट त्याचबरोबर शाळा याची माहिती असते. हे सर्व जमा करताना मोठी कसरत करावी लागते. दरवर्षी हा डाटा संकलित करताना अनेक अडचणी येतात. हा सर्व डाटा एकाच क्लिकवर मिळावा त्याच्यामध्ये सूत्रता असावी या उद्देशाने पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेने स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. वेब अप्लिकेशनच्या माध्यमातून संस्थेचा कारभार अत्याधुनिक होणार आहे.

Exit mobile version