43 वर्षातही जपली शाळेची अतूट मैत्री
| चिरनेर | प्रतिनिधी |
आपल्या सर्वांच्या शालेय जीवनाचा जीवन प्रवास हा काटेरी होता. मात्र, तो जीवन प्रवास सुखकरच होता असे प्रतिपादन सुरेश पाटील यांनी केले. जवळ जवळ 43 वर्षानंतर सेकंडरी स्कूल चिरनेर सन. 1982- 83 दहावी बॅचचा गेट-टुगेदर अर्थात स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम दहावी बॅचचे विद्यार्थी तथा सरपंच भास्कर मोकल यांच्या चिरनेर येथील रेवती फार्महाऊसवर आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकापचे चिटणीस तथा दहावी बॅचचे विद्यार्थी सुरेश पाटील हे आपल्या भाषणातून बोलत होते.
स्नेहमेळाव्यासाठी दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारा विद्यार्थी अनिल अनावकर हा कोल्हापूरवरून तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला शिल्पकार अजिंक्य चौलकर हा मुंबईवरून येऊन या स्नेहमेळाव्याचा आनंद घेतला. यापुढे सुरेश पाटील यांनी ध्येय गाठण्यासाठी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आपल्या दहावी बॅचचे विद्यार्थी मित्र राजकारण, समाजकारण, उद्योग, नोकरी, सहकार, शिल्पकला, पत्रकारिता, नाट्य अशा जीवनाच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये कार्यरत असून, तिथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसाही निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सरपंच भास्कर मोकल हे भाग्यवान आहेत.
प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करीत, आज ते या टप्प्यावर आले आहेत की, त्यांच्याकडे आता गरुडाच्या पंखांचे बळ आहे. आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण गावालाच अभिमान वाटेल अशी त्यांनी उंच उंच भरारी मारली आहे. त्यांच्याकडे सहकार्याची भावना असून, त्यांच्या सहकार्यातून त्यांनी अनेकांना नवी उमेद देण्याचे काम केले आहे असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सरपंच भास्कर मोकल यांनी हा स्नेह मेळावा म्हणजे एक आनंद सोहळा व स्नेह भेटीचे सुंदर स्वरूप असल्याचे सांगितले. 43 वर्षात आपण एकत्र आलो. याचा मला खूप आनंद असून, प्रत्येकाचा जीवन प्रवास कसा आहे, हे सर्वांनाच समजले. यापुढे आपण भेटत राहू, असे सांगितले.
प्रारंभी सर्वांच्या उपस्थितीत श्री महागणपतीला व हुतात्मा स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी प्रत्येकाचे स्वागत व व परिचय देण्यात आला. तसेच प्रत्येकाला रिटर्न गिफ्ट म्हणून, सरपंच भास्कर मोकल यांच्या सौजन्यातून सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल नारंगीकर, सूरदास राऊत, दिलीप पाटील, बी.सी. ठाकूर जयराम ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रत्येकाला आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली. यात सुरेश पाटील, दत्तात्रेय म्हात्रे, प्रदीप नारंगीकर यांनी नाट्य सादरीकरण करून विद्यार्थी मित्रांची वाहवा मिळविली. तर अजय पाटील, कांचन ठाकूर यांच्या गायकीतून संगीताचा कार्यक्रम पार पडला.







