पटसंख्येअभावी बिघडले शाळेचे गणित

खेड । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील 332 शाळांपैकी 132 शाळांची पटसंख्या 10 च्या आत तर 11 शाळांची पटसंख्या 70 च्या वर आहे. ही आकडेवारी पाहता जिल्हापरिषद शाळांची स्थिती समाधानकारक दिसत नाही. दिवसेंदिवस तालुक्यातील अनेक शाळा पटसंख्येअभावी ओस पडू लागल्या आहेत. सद्यस्थितीत 10 च्या आतमध्ये पटसंख्या असलेल्या 132 शाळा टप्प्याटप्प्याने बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
खासगी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हापरिषद शाळांतील काही शिक्षकांनी लोकसहभागातून वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या शाळेतील पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला असला तरी शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे या सर्व घडामोडींना मर्यादा येत आहेत. मोफत शिक्षणाची स्थानिक पातळीवर सोय असूनसुद्धा भरमसाठ फी भरून खासगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. काही गावांत मुलेच नाहीत तर शाळेत येणार कुठून? पहिली ते सातवी पर्यंत असणार्‍या या शाळांमध्ये शाळेत शिकण्यासाठी मुलेच नसल्यामुळे काही शाळा ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. शाळाच बंद असल्याने इमारती कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
राज्याच्या शिक्षण विभागाकडून गावातील प्रत्येक वाडीवस्तीवर शाळा उभारून गावातील मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्याचे धोरण आहे. किमान शिक्षण विभागाने या गावांचे सर्वेक्षण करून खरच मुले गावात आहेत की नाहीत. जर असतील तर ती शाळेत का येऊ शकत नाहीत, याची पाहणी करणे गरजेचे आहे.

Exit mobile version